नाशिक : डॉ. राहुल रनाळकर
दर बारा वर्षांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला मोठी संधी प्राप्त होते. आजवर या संधीचे हवे तसे सोने नाशिकच्या पदरी पडलेले नाही. नाशिककरांना सोडा पण गोदामाईलाही कुंभमेळा आयोजनातून उत्तम असे स्वास्थ्य आजवर लाभलेले नाही. पण ही शृंखला खंडित करण्याची शक्यता यंदाच्या कुंभमेळ्यानिमित्त निर्माण झालेली आहे. कुंभमेळ्याबद्दलचे आकर्षण प्रत्येक आयोजनावेळी अधिकाधिक वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून धर्म आणि सांस्कृतिक नगरी असलेले नाशिक जगाच्या नकाशावर, जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले व्हावे, अशी अपेक्षा करायलाच हवी.
नाशिक हे महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र असून, त्र्यंबकेश्वर, गोदावरी घाट, सप्तशृंगी देवी यांसारख्या धार्मिक स्थळांमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर १२ वर्षांनी येथे भरणारा कुंभमेळा ही नाशिकची जागतिक ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून साधू- संतांसह नाशिककरांची अपेक्षा आहे की, नाशिकचा विकास वाराणसीप्रमाणे जागतिक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून व्हायला हवा.
कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक गोदाकाठी आणि त्र्यंबकस्थित कुशावर्तात स्नानासाठी येतात. पण प्रश्न असा आहे की, रामतीर्थासारख्या घाटांवर अतिक्रमणांमुळे मोकळेपणा हरवला आहे. गोदावरी काठ मोकळा, स्वच्छ आणि श्वास घेण्यासारखा व्हायला काय हरकत आहे? वाराणसीप्रमाणे नाशिकमध्येही घाट परिसर सुधारून 'हेरिटेज वॉक', आरती स्थळे, भक्तांसाठी खुली जागा, मंदिरांची सुयोग्य स्थिती निर्माण करणे अत्यावश्यक आहे. पण यासाठी अतिक्रमण हटवण्याचे, रस्ते रुंदीकरणाचे धैर्य आणि दृढ निश्चयाची गरज आहे. घाटावर येणारे अरुंद रस्ते काशीप्रमाणे रुंद होतील का? ही अंमलबजावणी कोेण, कशी करून घेईल? हा प्रश्न उपस्थित होतो.
आगामी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक - त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर संकल्पनादेखील अतिशय महत्त्वाची ठरते. उत्तर प्रदेशातील काशी, गुजरातमधील द्वारका आणि मध्य प्रदेशातील महांकाल इथे असे कॉरिडॉर तयार झालेले आहेत. नाशिक - त्र्यंबकमध्ये तीर्थयात्रेचा अखंड, शिस्तबद्ध आणि सौंदर्यपूर्ण असा मार्ग उभा राहिल्यास भाविकांचा अनुभव निश्चितच दर्जेदार होईल. यात पायी यात्रा मार्ग, शटल सेवा, मेट्रो, माहिती फलक, स्वच्छतागृहे आणि आराम केंद्रांचा समावेश असावा.
याशिवाय, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाविकांची संख्या. वाराणसीमध्ये एका दिवसात सरासरी ५० लाख भाविकांची गर्दी होत होती. नाशिकमध्ये १० लाख लोक जरी एका वेळी दाखल झाले, तर सध्याच्या सुविधांमध्ये ती गर्दी आटोक्यात आणणे मोठे दिव्य ठरेल. विशेषतः समाज माध्यमांमुळे कुंभमेळ्याची प्रसिद्धी पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी वाढली आहे. त्यामुळे आगामी कुंभमेळ्यात गर्दीचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. २०१५ मधील कुंभमेळा आणि २०२७ मधील कुंभमेळा यांमध्ये फक्त काळाची नव्हे, तर तंत्रज्ञान, अपेक्षा आणि गर्दीच्या व्यवस्थापनातसुद्धा मोठी तफावत असणार आहे. ही बाब वेळीच ओळखून आधुनिक नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी वाराणसीचा अभ्यास करून त्याच धर्तीवर नाशिकचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या कायापालट व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. नाशिकच्या सध्याच्या धार्मिक महत्त्वाला आधुनिक नियोजनाची जोड मिळाल्यास हे शहर खरोखरच जागतिक धार्मिक नकाशावर उभे राहू शकेल. पण त्यासाठी अतिक्रमणमुक्त घाट, शिस्तबद्ध वाहतूक, सुरक्षित गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांसाठी सर्व अत्यावश्यक सुविधा असणे हे प्राथमिक टप्पे असावेत. नाशिकला वाराणसीसारखा जागतिक दर्जा देण्यासाठी केवळ घोषणा नव्हे, तर कठोर निर्णय, दीर्घदृष्टी आणि समाजाच्या सहकार्याची आवश्यकता यंत्रणांना लागणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे वेगळे न मानता जुळी शहरे या नात्याने दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या सुधारणा आणि पायाभूत सुविधा प्रचंड वेगाने कराव्या लागणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. राजकीय दृष्टी आणि प्रशासनावरील पकड या दोन्ही बाबी नाशिकच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.