नाशिक : येथे आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आडगाव शिवारातील ३३५ एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी वास्तुविशारदाची नियुक्तीही करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी नाशिककरांना आयटी पार्कचे आश्वासन दिले होते. नाशिकसाठी भरीव सिंहस्थ निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली होती. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांनी औचित्याच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान नाशिककरांना दिलेल्या घोषणांची आठवण सरकारला करून दिली. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी आमदार हिरेंच्या मागणीची दखल घेत, आयटी पार्कचा उल्लेख केला. नाशिकमध्ये आडगाव शिवारात ३३५ एकर जागेवर प्रस्तावित असून, या ठिकाणी वास्तुविशारदही नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी विधिमंडळात सांगितले. तसेच नाशिकमध्ये अद्ययावत आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्यामुळे आता नाशिकच्या आयटी पार्कला चालना मिळण्याची शक्यता आहे.
तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आडगाव शिवारात १० एकर जागेवर आयटी पार्कचे भूमिपूजन करण्यात आले होते. कुलकर्णी यांनी जवळपास ३३५ एकर जागा संपादित करण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. तत्कालीन केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नाशिकमध्ये आयटी कॉन्क्लेव्ह २०२२ ला हजेरी लावून आयटी पार्कसाठी निधी तसेच मंजुरी देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर आयटी पार्कचा मुद्दा बाजूला पडला होता. विधानसभेच्या निवडणुकीत आयटी पार्क चर्चेत येऊन सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेत आल्यास आयटी पार्क उभारण्याचे आश्वासन दिले होते.