The poor condition of Kalidas Kalamandir
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेबारा कोटी रुपये खर्च करून 'स्मार्ट सिटी' अंतर्गत सुशोभीकरण झालेल्या महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेचा 'अंक' थांबण्याचे नाव नाही. नाटककर व रंगकर्मीच्या प्रतिमा लावलेल्या लॉबीची छत गळती, पुरुष स्वच्छतागृहातील दुर्गंधी, प्लास्टरचे निघालेले पोपडे आणि ग्रीन रूममध्ये इलेक्ट्रिक पॉइंटची दुरवस्था तसेच दुसऱ्या मजल्यावरील अडगळ, जाळे-जळमटे आवारातही कचऱ्याचे ढीग यामुळे कालिदास कलामंदिर अस्वच्छतेचे केंद्र झाले आहे.
आषाढ शुक्ल प्रतिपदा अर्थात आषाढातील प्रथम दिवस थोर संस्कृत कवी तथा नाटककार महाकवी कालिदास यांचा जन्मदिन 'कालिदास दिन' म्हणून साजरा होतो. १९८७ मध्ये महाकवी कालिदास कलामंदिराची भव्य वास्तु उभारण्यात आली. नाशिकचे सांस्कृतिक वैभव म्हणून नाट्यगृहाने मान मिळवला खरा; परंतु त्याची दुरवस्था होत गेली. नाट्य अभिनेते प्रशांत दामले आणि अन्य रंगकर्मीनी कालिदासच्या दुरवस्थेबद्दल समाजमाध्यमातून टीका केल्यानंतर 'कालिदास'चा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत साडेबारा कोटी रुपये खर्च करून 'कालिदास'चे नूतनीकरणही करण्यात आले. परंतु नाट्यगृहाच्या दुरवस्थेच्या 'अंका'ला पुनश्च प्रारंभ झाला.
कालिदासदिनाच्या पूर्वसंध्येला दै. 'पुढारी' च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता नाट्यगृहाची दुरवस्था आणि अस्वच्छता दिसून आली. पिण्याच्या पाण्याचे कोल्ड वॉटर फिल्टर नादुरुस्त अवस्थेत अडगळीसारखे पडून आहे. तेथील पाण्याचा नळ तुटलेला असून, वॉटर फिल्टर तुटलेला आहे. पान, गुटखा खाऊन धुंकलेला कोपरा कैक वर्षापासून स्वच्छ केलेला नाही. पुरुष स्वच्छतागृहातून दुर्गंधी थेट नाट्यगृहात बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत जात असल्याने त्यांचा रसभंग होत आहे.
ग्रीनरूमध्ये लाइट गायब आहेत. प्लास्टर केलेल्या भिंतींवर पाणी पडून पडलले पोपडे, लॉबीमधील पाणीगळती यामुळे नाट्यगृहाची दुरवस्था होत आहे. नाट्य परिषदेच्या हॉल शेजारील जिन्यात अडगळ, वृक्षांची मुळे भिंतीवर पसरलेली दिसत असून, त्यामुळे ओल आणि पाणी यामुळे जाळे जळमटे, भिंतीचे पोपडे पडले आहेत.
'कालिदास'ची सफाई नियमित होते. दर दोन-तीन दिवसांनी कचरा गाडी येऊन कचरा नेते. जिन्याखाली बाहेरचे लोक थुंकतात. त्याला काय करणार. लोकांनी सुधारण्याची गरज आहे.- मोहन गिते, व्यवस्थापक, महाकवी कालिदास कलामंदिर
'कालिदास' चे पहिल्या मजल्यावरील कुलूपबंद सभागृह हौशी रंगकर्मीसाठी नाटकाच्या तालमीसाठी खुले करून द्यावे त्याचे रितसर शुल्कही घ्यावे. यासह महात्मा फुले कलादालनाचे दोन विभाग करून एकात 'ब्लॅकबॉक्स' करावा दुसऱ्या भागात छोटेखानी कलादालन करता येईल.