नाशिक : नील कुलकर्णी
शहरात कमी झालेली मैदाने आणि नागरिकांची वाढती व्यग्रता, व्यवधाने यामुळे इच्छा असूनही अनेकांना क्रिकेट खेळता येत नाही. याचा आनंद घेता यावा म्हणून सर्व बाजूने जाळीबंद कव्हर, प्रकाशझोत रचना असलेल्या टर्फ क्रिकेटचा उदय झाला. यामुळे नाशकात 'टर्फ क्रिकेट कल्चर' चांगलेच रुजल्याचे आश्वासक चित्र आहे. दिवसा आणि रात्री खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, संघटना, व्यापारी व व्यावसायिकांचा टर्फकडे कल वाढल्याचे दिसत आहे.
मैदानावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटची मजा आणि वेगळी आनंददायी असतेच. हल्ली कमी झालेली मैदाने, व्यग्र जीवनशैली यामुळे मैदानावर जाऊन क्रिकेट खेळणे अपुरी मैदाने अन् प्रकाशयोजना नसल्यामुळे कमी झाले आहे. त्यामुळे नव्या काळात टर्फला महत्त्व आल्याचे चित्र आहे. मैदानावरील क्रिकेटपेक्षा टर्फचा सामना वेगळाच असतो. त्याची सर बंद जागेत खेळल्या जाणाऱ्या टर्फ क्रिकेटला नक्कीच नसते. मात्र, कमी झालेली मैदाने, खेळासाठी लागणा-या खेळाडूंना एकाच वेळी खेळण्यासाठी लागणारा वेळ यामुळे क्रीडांगणावरील क्रिकेटपेक्षा अनेक जण टर्फ खेळ पद्धतीला पसंती देत आहेत. नाशिकमध्ये सुमारे ५५ ते ६० ठिकाणी अशी सेवा क्रीडापटूंची क्रिकेट भूक भागवत आहे.
अनेक सामाजिक गट, व्यापारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक यांनाही सोयीनुसार 'टर्फ'मध्ये खेळता येते. तासांप्रमाणेही तसेच पूर्ण मॅचसाठी ६ ते ७ हजार रुपये आकारून टर्फ उपलब्ध करून दिला जातो. साहजिकच त्यामुळे क्रीडा आनंद आणि खेळण्यातून निरोगी आरोग्याचे फायदे, असा दुहेरी लाभ मिळत आहे. एकूणच शहरात टर्फ क्रिकेटची नवी क्रीडा संस्कृती रुजल्याचे चित्र आहे.
बॉक्स क्रिकेटचे अनेक सेंटर शहरात वाढले आहेत. मैदानावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचा आनंद यामध्ये नसला, तरी महिला, अनेक समाजातील क्लब, व्यापारी, कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, व्यावसायिक यांचा बॉक्स क्रिकेट खेळण्याकडे कल वाढला आहे. शारीरिक व्यायामातून आरोग्य 'फिट' ठेवण्याचेही उद्दिष्ट यामुळे साध्य होत आहे.समीर रकटे, सचिव, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन, नाशिक.
शहरात ६० ते ७० ठिकाणी ठराविक पैसे आकारून ते उपलब्ध करून दिले जाते. अनेकांना वेळेअभावी मैदानांवर खेळणे शक्य होत नाही. यामध्ये वेळेनुसार कधीही खेळता येते. महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह व्यापारी, व्यावसाायिक रात्रीच्या वेळी क्रिकेटसाठी स्लॉट बुक करतात.विपुल नेरकर, संचालक, टर्फ क्रिकेट, नाशिक