The decision on seat-sharing within the alliance will be made in two days.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तीन दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचे चर्चेचे गुन्हाळ सुरूच आहे. भाजपला रोखण्यासाठी एकजूट झालेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपात नेत्यांना तडजोड करताना मोठी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. मात्र, आघाडीतील चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, सात ते आठ प्रभागांत अद्याप तोडगा निघू शकला नसल्याचे समजते. मात्र, दोन दिवसांत आघाडीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शहरात महाविकास आघाडीने बैठक घेत जागावाटपाची चर्चा केली. मात्र, जागावाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या पुढे जाऊ शकल्या नव्हत्या. ठाकरे बंधूंची युती झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत सामील होणार का हा प्रश्न उपस्थितीत होत होता. दोन्ही काँग्रेसने सुमारे ३० ते ४० जागांची मागणी केल्याने उबाटा मनसेने या मागणीचा प्रस्ताव धुडकावल्याने चर्चा थांबली होती.
मात्र नाशिकमध्ये भाजपच्या 'मास्टरस्ट्रोक 'नंतर महाविकास आघाडीने संख्येपेक्षा प्रभागातील प्रबळ उमेदवार आणि पक्षाची ताकदीचा आढावा घेत आता प्रभागनिहाय चर्चा सुरू केली. यात ज्या प्रभागात ज्या पक्षाचे प्राबल्य आहे, ती जागा त्या पक्षाला सोडण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार २३ प्रभागांमधील उमेदवारांबाबत एकमत झाले असल्याचे समजते. उर्वरित ८ प्रभागांत सर्वच पक्षांनी दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. येत्या एक-दोन दिवसांत हा विषयदेखील निकाली काढण्यात येणार असून, रविवारपर्यंत आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
खासदार देसाईंनी केली चर्चा
शुक्रवारी (दि. २६) उबाठाचे खासदार अनिल देसाई नाशिकमध्ये आले असता, त्यांनी शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा केली.
प्रस्तावावर प्रदेश पातळीवर चर्चा
नाशिकमध्ये मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस राजी झाली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रभागनिहाय चर्चा झाली. त्याबाबतचा जागांचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसला देण्यासाठी तसेच नाशिकमधील आघाडीतील जागावाटपासंदर्भातही प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी पक्षाचे शहराध्यक्ष आकाश छाजेड शुक्रवारी (दि. २६) मुंबईला गेले होते. शुक्रवारी रात्री ते प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.
आघाडीत अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. जिथे ज्या पक्षाची ताकद आहे, तिथे त्यांचा उमेदवार असे सूत्र निश्चित करत आम्ही प्रभागनिहाय चर्चा करत आहोत. शेवटी प्रत्येकाला आपला पक्षसंघटन वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे काही जागांबाबत रस्सीखेच असेलही परंतु, भाजपला रोखण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आमची चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असून, येत्या दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि आघाडीची घोषणा होईल.गजानन शेलार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट