नाशिक : काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाम घाटात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकच्या सागर चौगुले, अनिकेत कोठुळे आणि सागर कोठुळे यांनी आपले जीव केवळ मॅगीमुळे वाचले.
मॅगीची ऑर्डर दिल्यानेच आज आम्ही जिवंत आहोत. केवळ नशिबाने आम्ही तिघे वाचलो. मॅगीसाठी थांबलो नसतो, तर आमचेही जीव गेले असते, असा हल्ल्याचा थरारक अनुभव सांगताना तिघांनाही अश्रू अनावर झाले होते.
पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्याविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नाशिकचे सागर चौगुले, अनिकेत कोठुळे आणि सागर कोठुळे हे तिघेही हल्ल्याच्या वेळी जवळच होते. तिघेही मॅगी खाण्यासाठी थांबले होते. तिघांनी मॅगी खाल्ली. थंड वातावरण आणि गरम मॅगीमुळे मॅगीची चव आवडली म्हणून तिघांनी मॅगीची पुन्हा ऑर्डर दिली अन् मॅगी तयार होण्याची वाट बघू लागले. त्याचवेळी भारतीय नौदलाचे विनय नरवाल हे त्यांच्या जवळून पुढे चालले होते. क्षणार्धात काही कळायच्या आत गोळीबार सुरू झाला. लोक घाबरले अन् सैरावैरा पळत सुटले. अचानक परिसरात हसत खेळत बागडत असलेल्या कुटुंबीयांचे मृतदेह मैदानावर दिसू लागले. हा क्षण अत्यंत भयंकर होता. केवळ नशिबाने मॅगीची दुसर्यांदा ऑर्डर दिली आणि प्राण वाचले. एकदा मॅगी खाऊन निघालो असतो, तर आमचेही प्राण गेले असते अशी प्रतिक्रिया चौघुले आणि कोठुळे यांनी दिली.
अनिकेत कोठुळे म्हणाले की, गोळीबारामुळे स्थानिक लोकही घाबरले होते, दो लोग दफन हो गये हा स्थानिकांचा संवाद ऐकून आम्ही माघारी परतण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांनी महिलांना कपाळावरील टिकली, अंगावरील दागिने काढायला सांगितले. हिंदू नाव अजिबात घेऊ नका असे ओरडून त्यांनी सांगितले. डोळ्यात सुरमा घाला, बुरखा परिधान करा असेही सांगितले. हल्ल्याचे भय एवढे तीव्र होते की, सोबत असलेल्या काही महिला अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नसल्याचे कोठुळेंनी स्पष्ट केले.