'ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना' अंतर्गत जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, निफाड, येवला तालुक्यांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक प्रकल्पाद्वारे सन 2022-23 मध्ये आठ कोटी 56 लाख रुपये खर्चून आठ तालुक्यांतील 64 गावांना, तर सन 2023-24 मध्ये आठ कोटी पाच लाख रुपये खर्चून 77 गावांना योजनांचा फायदा पोहोचविण्यात आला आहे. योजनेमुळे आदिवासींना सोयी-सुविधा प्राप्त होत असून, जीवनमान उंचावत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या 20 जानेवारी 2021 च्या शासन परिपत्रकान्वये पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के अबंध निधी हा राज्यस्तरावरील योजना जिल्हा योजनेंतर्गत वर्ग केला असल्यामुळे जिल्हास्तरावरील समप्रमाणातील दायित्व कमी करण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना ही योजना सन 2021-22 या स्तरावर वर्ग करण्यात आली आहे. आदिवासी मुलींचे विवाह, कौटुंबिक कार्यक्रम ठक्कर बाप्पा योजनेतून बांधण्यात आलेल्या सभागृहांमध्ये पार पडत आहेत. केवळ वने आणि जंगलसंपत्तीवर जीवन जगणार्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे होत आहे. (Thakkar Bappa Adivasi Vasti Sudhar Yojna)
राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र, माडा, मिनीपाडा, वाड्या, पाडे, वस्त्या समूह यांमध्ये सामूहिक विकासाच्या सोयी-सुविधा आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण करणे.
पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करणे, फिल्टर प्लँट उभारणे, आदिवासी वस्ती, वाडे, पाडे, नाले-मोर्या बांधणे, शासकीय आश्रमशाळा-एकलव्य निवासी शाळांना मुख्य रस्त्यास जोडणारे रस्ते, वस्तींचे विद्युतीकरण, पथदीप बसविणे, समाजमंदिर, सभागृह, स्मशानभूमी, बस थांबा, प्रवासी शेड उभारणे, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका उभारणे.
योजनेद्वारे आदिवासी वस्ती-पाड्यांवर लोकसंख्येच्या तुलनेत निधीचा खर्च करण्यात येतो. तीन हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्तीत एक कोटी, 1500 ते 3 हजार लोकसंख्येसाठी 75 लाख, 1 हजार ते 1500 साठी 50 लाख, 500 ते 1 हजारसाठी 40 लाख, 101 ते 500 लोकसंख्येसाठी 20 लाख, 100 लोकसंख्येसाठी 5 लाख रुपये खर्च करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सन 2024-25 साठी 59 कोटी 81 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्या आदिवासी भागात पायाभूत सुविधा नाहीत अशा वस्ती / वाडे / पाडे / समूह अशा ठिकाणी योजना राबविण्यात यावी.
इतर योजनांमधून घेतलेली कामे वगळून इतर कामे करावीत. योजनेसाठी दिलेला निधी 2 वर्षांत खर्च करावा.
3 हजारहून अधिक - 1 कोटी
1500 ते 3 हजार - 75 लाख
1000 ते 1499 - 50 लाख
500 ते 999 - 40 लाख
101 ते 499 - 20 लाख
1 ते 100 - 5 लाख