मनमाड (नाशिक) : शिवसेना-मनसे यांच्यात युती होऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (दि. 24) ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, शहरप्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली मनमाड ते श्रीक्षेत्र शनी नस्तनपूर पायी यात्रा काढण्यात आली. यात्रेत कार्यकर्त्यांनी 40 किमी पायी चालून नस्तनपूर येथे पोहोचल्यानंतर शनी महाराजांना ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणासाठी साकडे घातल्याची माहिती शहरप्रमुख माधव शेलार यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-मनसे युती होणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दोघा बंधूंनी एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. मात्र, युती होणार की, नाही हे गुलदस्त्यात असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता आहे. या पार्श्वभूमीवर उबाठा कार्यकर्त्यांनी नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे पायी यात्रा काढत शनिदेवाला साकडे घातले. या पदयात्रेत जिल्हाप्रमुख नाईक यांच्यासह सुनील पाटील, संतोष गुप्ता, श्रावण आढाव, शैलेश सोनवणे, विनय आहेर, मायकल फर्नांडिस, गोटू केकाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.