नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2009 आरटीई अॅक्टनुसार पहिली ते आठवी शिकवत असलेल्या सेवेतील शिक्षकांना दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यामुळे रविवारी होणार्या शिक्षक पात्रता परीक्षेत सेवेतील शिक्षकांचा मोठा कस लागणार असून, उमेदवारांची संख्या यावेळी कमालीची वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि. 23) होणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सेवेतील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार असून, जिल्ह्यात तब्बल 32 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 86 परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. अनेकदा डमी उमेदवार बसवून पात्रता मिळवण्याचे प्रकार घडत असल्याने यावेळी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेत फोटो आणि डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी केली जात आहे. उमेदवारांकडे मोबाइल असल्यास हॅण्डहोल्ड रीडरद्वारे तपासणी केली जाणार आहे. याशिवाय परीक्षेसाठी एआय तंत्राचाही वापर केला जाणार आहे. मागील परीक्षा नोव्हेंबर 2024 मध्ये झाल्याने तब्बल एक वर्षानंतर ही परीक्षा होत असून, उमेदवारांची संख्या यामुळेही वाढली आहे.
32 हजार उमेदवार देणार परीक्षा
यंदाच्या परीक्षेमध्ये शहरात 32 हजार 31 विद्यार्थी बसणार आहेत. त्यापैकी 13 हजार 204 उमेदवार पेपर 1 साठी, तर 18 हजार 827 उमेदवार पेपर 2 साठी बसणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी 86 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. पेपर 1 साठी 32, तर पेपर 2 साठी 54 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहे.
परीक्षेत विशेष लक्ष
यावर्षी परीक्षा केंद्र संचालक, परीक्षा नियंत्रण कक्ष आणि राज्य परीक्षा परिषद कार्यालयात समन्वय राहावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. डमी उमेदवार बसू नयेत यासाठी मागील टीईटी परीक्षेतील छायाचित्रांची नवीन छायाचित्रांशी तुलना केली जाईल. दुप्पट अर्ज किंवा नाव बदल असल्यास उमेदवारांनी विवाह प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी काटेकोर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.