दातली/किर्तांगळी ( सिन्नर, नाशिक) : बिबट्याने केलेला हल्ला शेतकर्याने प्रसंगावधान राखत परतवल्याने त्याचा जीव बचावल्याची दिलासादायक घटना तालुक्यातील एकलहरे येथे घडली. संतोष प्रभाकर शेळके असे या शेतकर्याचे नाव आहे.
तत्पूर्वी बिबट्याने शेळके यांच्या तीन शेळ्यांचा फडशा पाडला, तर एक शेळी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. सोमवारी (दि. 1) पहाटे 6 च्या सुमारास ही घटना घटली. संतोष शेळके यांच्या गट क्रमांक 30 मध्ये गाय व शेळ्यांसाठी शेड केलेले आहे. संतोष शेळके हे नेहमी जनावरांना राखण म्हणून या शेडमध्येच झोपत असतात. मात्र ते लग्नसमारंभासाठी बाहेर गेल्याने रात्री शेडमध्ये थांबले नव्हते. तथापि, पहाटे दूध काढण्यासाठी ते शेडमध्ये गेले असता, बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
प्रसंगावधान राखत त्यांनी हातातील किटली आणि बादली ढाल म्हणून वापरल्यामुळे ते थोडक्यात बचावले. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या जाळीच्या वरून उडी मारून पसार झाला. हल्ल्यानंतर संतोष यांचा भीतीने थरकाप उडाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती पोलिसपाटील श्रीराम घुले यांना मिळताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनपाल संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व घटनास्थळी पिंजरा लावला आहे. सात फूट उंच लोखंडी जाळी असलेल्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून बकर्या फस्त केल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
शेडमध्ये होते दोन बिबटे, एक बछडा
घटनेच्या वेळी संतोष यांनी दोन बिबटे आणि बछडा शेडलगत पाहिले असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वीही परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून आलेले आहे. सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी बिबट्याने विलास वामन गोधडे यांच्या शेळीचा फडशा पाडला होता. त्या प्रकरणातही मोठे नुकसान झाले. शेतकर्यांनी वनविभागाकडे तक्रार नोंदवली होती.