आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 'टेंट सिटी' उभारण्यात येणार आहे.  Pudhari News Network
नाशिक

Tent City Nashik : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दहा एकरांत उभारणार 'टेंट सिटी'

एमआयडीसीचा पुढाकार : सिंहस्थात येणाऱ्या उद्योजकांसाठी हक्काचा निवारा

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Industrial Development Corporation to set up 'Tent City'

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांसमवेत देशभरातील उद्योजकही सहकुटुंब येण्याची शक्यता असल्याने, त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 'टेंट सिटी' उभारण्यात येणार आहे. ही टेंट सिटी तब्बल १० एकर परिसरात उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी लागणारा निधी सीएसआर आणि एमआयडीसी संयुक्तपणे उभारणार आहे.

काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये जिल्ह्यातील उद्योगांचे प्रश्न आणि नवीन गुंतवणूक याबाबत आढावा घेताना, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात एमआयडीसीचाही सहभाग दिसावा तसेच सिंहस्थात येणाऱ्या देशभरातील उद्योजकांना नाशिकचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या हेतूने उद्योजकांसाठी टेंट सिटी उभारण्याबाबतची संकल्पना मांडली होती. ही टेंट सिटी कंपन्यांकडून मिळणाऱ्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) आणि एमआयडीसी अशा संयुक्त निधीतून उभारली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार एमआयडीसी बांधकाम विभागाकडून नुकतेच उद्योग विभागाला टेंट सिटीबाबतचे इतिवृत्त पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये 10 एकर जागेत टेंट सिटी उभारण्याबाबत नमूद केले आहे. तसेच टेंट सिटी शासनाच्या जागेवर उभारावी की, खासगी जागेत भाडेतत्त्वावर उभारावी, शहरातील कोणत्या भागात टेंट सिटी उभारावी, त्यासाठी किती कोटींचा निधी उभा केला जावा आदींचे मार्गदर्शन उद्योग विभागाकडे मागविण्यात आले आहे.

दरम्यान, प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जगभरातील नामांकित उद्योजकांनी हजेरी लावत गंगास्नान केले होते. त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थातदेखील नामांकित उद्योजक सहकुटुंब येण्याची शक्यता असल्याने, एमआयडीसी त्यांच्या निवासासाठी टेंट सिटी उभारण्यास आग्रही आहे. यातून राज्याचे पर्यायाने नाशिकचे औद्योगिक महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हेतू एमआयडीसीचा आहे.

टेंट सिटीबाबतचे इतिवृत्त उद्योग विभागाला पाठविण्यात आले आहे. याबाबतचे मार्गदर्शन उद्योग विभागाकडून लवकरच केले जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
जयवंत पवार, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT