नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस कंपनीतील 'कथित' धर्मांतर प्रकरणात सात महिन्यांपासून अटकेत असलेला मुख्य आरोपी दानिश शेख याच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी मंगळवारी (दि. २६) जिल्हा सत्र न्यायालयात न्या. ए. व्ही. खारकर यांच्यासमोर पार पडली. सुमारे दीड तास चाललेल्या इन-कॅमेरा सुनावणीत सरकारी पक्ष, बचाव पक्ष आणि पीडितेच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला.
गंभीर आरोप आणि तपासात समोर आलेल्या पुराव्यांचा दाखला देत सरकारी पाक्षने जामीनाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी न्यायालयात बाजू मांडताना, दानिश विवाहित असून, त्याने ही बाब सोबत काम करणाऱ्या पीडितेपासून लपवल्याचा आरोप केला.
लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणे, तिला विशिष्ट धर्माच्या प्रथा स्वीकारण्यास प्रवृत्त करणे, बुरखा व धार्मिक पुस्तके देणे, तिचे नाव विशिष्ट धर्मातील ठेवण्याची योजना आखणे आणि त्यासाठी आधारकार्ड ताबात घेणे, असे गंभीर आरोप त्यांनी मांडले.
पीडितेच्या घरातून धार्मिक पुस्तके, काही व्हिडिओ आणि पेहराव जप्त करण्यात आल्याचा दाखला देत, धर्मांतराचा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा सरकारी पाक्षने केला. पीडितेची आर्थिक फसवणूक करून तिला परदेशात पाठविण्याचीही 'कथित' योजना आखण्यात आल्याचे सांगत, अनेक पुरावे सादर केले असल्याने आरोपीला जामीन देऊ नये, अशी विनंती ॲड. मिसर यांनी केली.
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील 'कथित' धर्मांतर प्रकरण मार्च २०२६ मध्ये उघडकीस आले. या प्रकरणात देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त आहे. आठ महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींनंतर प्रकरणाची व्याप्ती वाढली. पोलिसांनी आठ आरोपांना अटक केली असून, नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास करण्यात आला आहे.
दानिशचे वकील ॲड. उमेश वालझाडे यांनी सरकारी पक्षाच्या आरोपांना विरोध केला. दानिश आणि पीडित महिला मित्र-मैत्रीण होते, महाराष्ट्रात संबंधित धर्मांतरविरोधी कायदा गुन्हा दाखल झाला तेव्हा अस्तित्वात नव्हता आणि दानिशवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता, असे मुद्दे त्यांनी मांडले. अन्य एका गुन्ह्यात दानिशला जामीन मिळाल्याची दाखला देत या प्रकरणातही जामीन मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
पीडितेचे वकील ॲड. मिलिंद कुरकुटे यांनी, प्रमोशनचे आमिष दाखवून मैत्री करणे, प्रेमाचे नाटक करून धर्मांतर घडवून आणणे आणि पीडितेचे मानसिक खच्चीकरण करणे, असे आरोप मांडले. दानिशचा हेतू धर्मांतर घडवून आणण्याचा असल्याचा दावा करत त्यांनीही जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली. आता न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.