नाशिक : शहरातील तपोवन आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील प्लायवुडच्या दुकानांना लागलेल्या आगीत तब्बल अडीच कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नसले, तरी तिची धग शनिवारीही कायम असल्याने अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.
गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील संत जर्नादन स्वामी शेजारील सेलिब्रेशन लॉन्ससमोरील प्लायवुडच्या दुकानास आग लागली होती. ही घटना ताजी असतानाच, शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्री तपोवन परिसरातील मारुती वेफर्सजवळील प्लायवुडच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. दोन्ही आगी इतक्या भीषण होत्या की, सलग दोन दिवस आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. शनिवारी (दि. १९) देखील अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते. तपोवन येथील आग विझविण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमधून १६ अग्निबंब मागविण्यात आले होते. या बंबांनी शंभरपेक्षा अधिक फेऱ्या केल्या.
या दोन आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील आगीत सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले असून, तपोवनमधील आगीत दोन कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दोन्ही आगींचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे किंवा उष्णतेमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण सांगणे सध्या कठीण असल्याचे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.