नाशिक : सातपूर विभागातील पाचवर्षीय बालकाचा रविवारी (दि.13) डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आली आहे. ऑक्टोबरच्या गेल्या 17 दिवसांतच 66 नवे रुग्ण आढळले असून, यामुळे डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा 1,038 वर पोहोचला आहे. (There has been an outbreak of dengue disease in Nashik for the past few months)
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. एरवी पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव जोमाने वाढतो. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी कडक उन्हाळ्यातच डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती
मे महिन्यात डेंग्यू या आजाराचे तब्बल 33 नवे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूचे 163 नवे रुग्ण आढळले, तर जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचे विक्रमी 307 रुग्ण आढळले होते. पावसाच्या पाण्याची ठिकठिकाणी साचलेली डबकी या आजाराच्या उद्रेकास कारणीभूत ठरली. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 198 नवे रुग्ण आढळले. तर सप्टेंबरमध्येही या आजाराची लागण झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा 198 इतकाच होता. पावसाळा आता परतीच्या मार्गावर असताना डेंग्यूचा उद्रेक मात्र कायम राहिला आहे. 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान डेंग्यूचे 66 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 14 ऑक्टोबर या कालावधीतील डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता 1,038 वर पोहोचला आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे उपचाराअंती बरे झाले आहेत.
सातपूर विभागातील दत्तराजनगर परिसरातील बालकाचा रविवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. परिसरातीलच खासगी रुग्णालयात या बालकावर उपचार सुरू होते. डेंग्यूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निदान संबंधित रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. या घटनेनंतर मनपाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने संबंधित बालकाच्या घरी जाऊन तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या बालकाच्या घराला कुलूप आढळून आल्याने वैद्यकीय पथकाला अधिक तपासणी करणे शक्य झाले नाही. घराच्या परिसरात कीटकनाशक फवारणी व धुरळणी करण्यात आली आहे.
डेंग्यू प्रादुर्भावास कारणीभूत ठरणार्या एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती आठ दिवसांपेक्षा अधिक काळ साठून राहिलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे नागरिकांनी आठ दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेवू नये. साठवलेले पाणी रिते करून भांडी स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांनी केले.