स्वाइन फ्लू pudhari file photo
नाशिक

नाशिककरांनो काळजी घ्या! डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूचाही उद्रेक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बदलते वातावरण रोगराईला पोषक ठरत असून, शहरात डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूचा उद्रेक झाल्याचे समोर आले. सप्टेंबरच्या गेल्या २५ दिवसांत या आजाराचे २४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूग्रस्तांचा गेल्या नऊ महिन्यांतील आकडा २२७ वर पोहोचला आहे, तर या आजाराने १४ जणांचा बळी गेला. बळींमध्ये नाशिक शहरातील चार, तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा समावेश आहे. (The changing environment is feeding disease, and after dengue, swine flu outbreak has come to light in Nashik city)

डेंग्यूच्या साथीने नाशिककरांना धडकी भरवली असताना, वातावरणातील बदल स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावाचे कारण ठरला आहे. पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे स्वाइन फ्लूला निमंत्रण मिळाले. त्यामुळे जून महिन्यापर्यंत नाशिकमधील स्वाइन फ्लूची लागण झालेल्यांची संख्या ७० होती. त्यात नाशिक शहरातील ४३, तर ग्रामीण भागातील २७ रुग्णांचा समावेश होता. जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर या आजाराचा प्रादुर्भाव वाढला. जुलैत ५० रुग्ण आढळले, तर ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत आणखी वाढ होऊन या एकाच महिन्यात ८३ नवे रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्येही स्वाइन फ्लूचा उद्रेक कायम राहिला असून, शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी १२ याप्रमाणे २४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे १ जानेवारी ते २५ सप्टेंबर या कालावधीतील स्वाइन फ्लूग्रस्तांचा आकडा २२७ वर पोहोचला आहे. या आजाराने बळी गेलेल्यांची संख्याही १४वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लूचा वाढता उद्रेक धोकादायक स्थितीत पोहोचल्यामुळे गुरुवारी (दि. २६) महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी तातडीची बैठक घेत या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

विषाणूत जनुकीय बदल?

कोरोनाप्रमाणेच स्वाइन फ्लूच्या विषाणूतही जनुकीय बदल झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूग्रस्तांचे स्वॅप नमुने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्वाइन फ्लूवर उपचार करणे अधिक सोयीचे होणार आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे

थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आदी या आजारांची लक्षणे आहेत. स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पौष्टिक आहार घ्यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री व हिरव्या पालेभाज्या यांसारख्या पदार्थांचा वापर आहारात करावा. रुग्णांनी मास्क वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.

वातावरणातील बदलामुळे शहरात स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढल्याचे दिसत आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT