Tajiya Muharram
जुने नाशिक : १९८० साली इमाम शाही येथील 'हालो का ताजिया' इमाम शाह बाबा दर्गा परिसरात दर्शनप्रसंगी सय्यद परिवार व खांदेकरी हिंदू बांधव. (छाया : अबुल कादिर पठाण)
नाशिक

Tajiya Muharram Nashik | 'हालो का ताजिया' आजपासून दर्शनास खुला

पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक : सारडा सर्कल येथील इमाम शाही भागात सय्यद परिवाराकडून अनेक दशकांची परंपरा जोपासत 'हालो का ताजिया' तयार करण्यात येतो. ताजिया करण्याचे काम पूर्ण झाले असून, रविवार (दि. १४) पासून भाविकांना ताजियाचे दर्शन घेता येणार आहे. बुधवारी (दि.१७) ताजिया मोहर्रमची 10 तारीख असून, यौम-ए-आशूरा साजरा होणार आहे.

'मोहर्रम-उल-हराम' अर्थात मोहर्रम महिन्यात विशेष करून पैगंबर साहेबांचे नातू शाहिद-ए-आजम हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. सारडा सर्कल येथील इमाम शाही येथे हजरत इमाम शाह बाबा दर्गा परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोहरमनिमित्त 'हालो का ताजिया' तयार करण्याची परंपरा आहे. यंदाही आशूरखाना हॉल येथे कलीम सय्यद, मुजफ्फर सय्यद, मलिक सय्यद, मीर अली सय्यद, मुजीब सय्यद, अशरान सय्यद, अझनान सय्यद, मोहिद सय्यद आदी सय्यद कुटुंबीयांतर्फे 'हालो का ताजिया' तयार करण्यात आला आहे.

हिंदू बांधवांना ताजियाचे खांदेकरी होण्याचा मान

आशूराच्या दिवशी म्हणजेच मोहर्रमच्या 10 तारखेला बाहेर मैदानात आणला जातो. यावेळी आशूरखाना हॉलपासून बाहेर मैदानापर्यंत व तेथून जमिनीत दफन कारण्यापर्यंत इमाम शाहीलगत असलेल्या कोळीवाडातील हिंदू बांधवांना ताजियाचे खांदेकरी होण्याचा मान दिला जातो. शंकर डमाळे, सदानंद खोकले, विष्णू डमाळे, अनिल देशमुख, दत्तू खोंडे आदी हिंदू बांधवांना खांदेकरींचा मान आहे.

'हालो का ताजिया'साठी खांदेकरी होण्याचा मान तीन ते चार पिढ्यांपासून आम्हाला मिळत आहे. मोहर्रम महिन्याच्या 10 तारखेला आम्ही खांदेकरींच्या जबाबदारीला अग्रस्थानी ठेवतो.
सदानंद खोकले, खांदेकरी, नाशिक.

मोहरमचा दिवस म्हणजे इस्लामिक नववर्षाची सुरुवात

इस्लामिक कॅलेंडरनुसार, इस्लामिक नवीन वर्ष मोहरमच्या दिवशी सुरू होते, ज्याला हिजरी कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. बकरी ईद नंतर सुमारे २० दिवसांनी मोहरम साजरा केला जातो.

SCROLL FOR NEXT