Death due to swine flu
निफाड तालुक्यातील ५८ वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्लू' ने मृत्यू झाला आहे. File Photo
नाशिक

Swine Flu| काळजी घ्या ! नाशिक जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'चा दहावा बळी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, निफाडच्या ५८ वर्षीय व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील स्वाईन फ्लू बळींचा आकडा दहावर गेला आहे. चालु महिन्यात नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात एक नवा स्वाईन फ्लू बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

डॉक्टरचाही झाला मृत्यू

  • बदलते वातावरण स्वाईन फ्लू आजाराच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरले आहे.

  • जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळून आले होते.

  • एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले.

कडक उन्हातही प्रसार वाढला

त्यानंतर मे महिन्यातील कडक उन्हातही या आजाराचा प्रसार वाढत गेला. सिन्नर मधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९ वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिला तसेच नाशिकमधील जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्यांचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला. पाठोपाठ दिंडोरीतील ४२ वर्षीय महिला आणि चांदवड तालुक्यातील तिसगाव भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी गेला आहे. नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. परंतू प्रकृती अधिकच खालवल्याने २० जून रोजी या रुग्णाची प्राणज्योत मालवली. या रुग्णाचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला आहे.

जिल्ह्यात ६० जणांना लागण

जूनच्या गेल्या २५ दिवसात नाशिक शहरात स्वाईन फ्लूचेच पाच तर ग्रामीण भागात १ नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील स्वाईन फ्लू बाधितांचा आकडा ३५ वर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५ झाली आहे. शहरातील २ तर ग्रामीण भागातील ८ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.

शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसताच त्वरीत लगतच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. लक्षणे असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, मनपा.
SCROLL FOR NEXT