ठळक मुद्दे
मृत डुकराचा नमुना प्रयोगशाळेत आढळला पॉझिटीव्ह
१० किलोमीटर परिघातील परिसर निगराणी क्षेत्र घोषित
रोगावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजनेचे आदेश : डुकरा(वराहा)च्या मांस विक्रीवर नियंत्रण
नाशिक : नाशिक शहरात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील मृत वराह(डुकरा)च्या नमुन्याची भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसिज या प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर ही बाब उघड झाली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महापालिकेच्या पाथर्डी स्थित खतप्रकल्पाचा एक किलोमीटर परिघाचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह महापालिकेला देण्यात आले आहेत.
आफ्रिकन स्वाईन फिव्हर हा वराहमध्ये होणारा गंभीर आजार आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जलदगतीने होतो. नाशिक जिल्ह्यातील वराहांमध्ये मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्यानंतर प्रशासनाने खत प्रकल्प परिसरातील मृत वराहांचे नमुने भोपाळ येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये नाशिक महापालिका क्षेत्रातील पाथर्डी शिवारातील महापालिकेच्या खत प्रकल्पाच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच या लगतच्या दहा किलोमीटर परिघातील क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वराहांची कत्तल करणार
रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार बाधित क्षेत्राच्या १ किमी परिसरातील सर्व वराहांना मारण्यात येणार असून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावून त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित परिसरात सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे, वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देवून नियंत्रण ठेवावे, तसेच मोकाट पध्दतीने होणारे वराहपालन टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हा रोग झूनोटिक म्हणजेच प्राण्यांमधून माणसांमध्ये येत नाही. हा फक्त आजारी वराह यांच्यापासून इतर वराहांमध्ये गेल्यास त्यांच्यामध्ये झपाट्याने सांसर्गिकरित्या पसरतो. यामध्ये एक किलोमीटर परिसरामध्ये आजतागायत कुठलाही वराह परिसरात नाही. त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग याबाबत सक्षम आहे. तसेच यावर नियंत्रण आहे. आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या नियंत्रणाखाली सर्व परिस्थिती हाताळत आहोत.डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक
रोगाची लागण होण्याची कारणे
घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही बाब विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करून कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क होऊ देवू नये, वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्टया योग्यरितीने विल्हेवाट लावावी, वराहपालन करणारे पशुपालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.