पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
तलाठी भरती परीक्षेतील हायटेक कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश गुसिंगे याचा मुख्य साथीदार व मित्र अखेर गजाआड झाला आहे. याबरोबरच म्हसरुळ पोलिसांनी या प्रकरणात नौपाडा पोलिसांकडून कैलास रामसिंग बहुरे (वय २६, रा. जोडवाडी, पो. कचनेर, ता. जि. संभाजी नगर) याला ताब्यात घेतले असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
राज्यात तलाठी पदासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हसरूळमधील वेब इन्फोटेक सोल्युशन या परीक्षा केंद्रावर पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता. हायटेक पध्दतीने पेपर फोडल्या प्रकरणी मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली होती. यानंतर गुन्हा दाखल करुन पोलीस पथके संभाजी नगरात तळ ठोकून होते.
या पेपर फुटीप्रकरणी गणेश शाससिंग गुसिंगे (२८, रा. संजारपुरवाडी, परसोडा, ता. वैजापूर), सचिन नायमाने व एका महिलेसह संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा एक अट्टल पेपर फोड्या असल्याचे तपासात समोर आले असून पेपर फोडण्यासाठी त्याने एक टोळी तयार केल्याचे संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे गुसिंगे याचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? याचाही तपास पोलिसांनी सुरू केला होता. तेव्हा अनेकांवर संशयाची सुई होती. त्यानुसार या गुन्ह्यात एक वर्षापासून पाहिजे असलेला संशयित बहुरे हा नौपाडा पोलिसांकडील काही गुन्ह्यात अटकेत होता. आता म्हसरुळ पोलिसांनी शनिवारी (दि.३०) गुन्हा वर्ग करून त्यास ताब्यात घेतले असून पुढील पोलीस करत आहे.