नाशिक : कुपोषणमुक्तीसाठी राज्यात सुरगाणा पॅटर्नची चर्चा होत आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी स्तनपान कार्यक्रम आणि विविध योजनांच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीकडे पाऊल टाकले आहे. मार्च महिन्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या तब्बल ११७ ने कमी झाली आहे. मार्चमध्ये तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या २ हजार २४३ होती एप्रिल-मे महिन्यात ती संख्या २ हजार ६६ वर आली आहे.
गतवर्षी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिक दौऱ्यावर असताना कुपोषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आकांक्षित तालुका असलेल्या सुरगाण्यावर आपले लक्ष केंद्रीत करत कुपोषण मुक्तीसाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सर्वप्रथम सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना पौष्टीक आहार मिळत नसल्याने कुपोषीत बालके होत असल्याचे निर्देशनास आले होते. कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते. त्यामुळे बालकाच्या वजनात वाढ होते. तसेच अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात. या सर्व उद्देशाने कोंबड्या वाटपचा निर्णय झाला होता. या उपक्रमातंर्गत पहिल्या टप्यात सुरगाणा तालुक्यातील ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी कोंबड्या दिल्या गेल्या. या दोन्ही उपक्रमाचे परिणाम प्रामुख्याने एप्रिल महिन्यात दिसून आले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत या महिन्यातील कुपोषीत बालकांची संख्या कमी झाली आहे.
मार्च महिन्यात जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत ५ हजार १०९ अंगणवाडी केंद्रावर तीव्र कुपोषित ३०९ तर मध्य कुपोषित १९३४ अशी एकूण २ हजार २४३ बालेक कुपोषित होती. एप्रिल महिन्यात तीव्र कुपोषीत बालकांमध्ये ५७ तर, मध्यम कुपोषीत बालकांत १२० अशा एकूण १७७ ने घट झाली. या महिन्यात तीव्र कुपोषित २५२ तर, मध्यम कुपोषित १८१४ बालके होती.
जिल्हा परिषद आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम फेब्रुवारीत राबविण्याचा निर्णय घेतला. यात, या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या ३०० प्रशिक्षणार्थींचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणार्थींना कुपोषीत बालकांच्या मातांना स्तनपानासाठी "क्रॉस कँडल होल्ड" या पद्धतीने स्तनपान करण्यावर भर देण्यास सांगितले.