Court File Photo
नाशिक

Dr Nilesh Jejurkar | डॉ. नीलेश जेजूरकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला!

Dr Nilesh Jejurkar | आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी असलेले त्यांचे पती तथा जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयातही फेटाळण्यात आल्याची माहिती तक्रारदारांच्या वकिलांनी दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी असलेले त्यांचे पती तथा जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयातही फेटाळण्यात आल्याची माहिती तक्रारदारांच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे डॉ. जेजूरकर यांच्यासमोर तपास यंत्रणेसमोर हजर होण्याचा मार्ग उरला असून, त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.

तक्रारदार रोहिणी थोरात यांच्या वतीने अॅड. अभयसिंह भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही डॉ. जेजूरकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांच्या एकलपीठाने प्रथमदर्शनी डॉ. जेजूरकर यांच्याविरुद्ध गुन्हेगारी हेतू आणि मानसिक छळाचा पुरावा दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.

तसेच काही परिस्थितीमुळे हा प्रकार आत्महत्येऐवजी हत्या असण्याची शक्यताही तपासण्याची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. डॉ. मनीषा (४०) या ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या.

सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांच्या बहिणीने डॉ. जेजूरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली. पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधातून मनीषा यांचा दीर्घकाळ मानसिक छळ झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
५ मार्च रोजी कौटुंबिक विवाह सोहळ्यात डॉ. जेजूरकर यांनी मनीषा यांचा नातेवाईकांसमोर अपमान केल्याचा आणि कौटुंबिक छायाचित्रासाठी त्यांच्यासोबत उभे राहण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.

फिर्यादीचे वकील अॅड. अभयसिंह भोसले यांचा युक्तिवाद

शवविच्छेदन अहवालात डॉ. मनीषा यांच्या हातावर दोन इंजेक्शनच्या खुणा आढळून आल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. डॉ. मनीषा यांचे वजन, घटनास्थल असलेल्या दोरीची लांबी व जाडी तसेच खिडकीची उंची व रचना लक्षात घेता, त्या ठिकाणी अशा पद्धतीने गळफास घेऊन आत्महत्या करणे शक्य होते का, याबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

डॉ. मनीषा यांच्या मृत्यूनंतर संशयित डॉ. नीलेश जेजूरकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ इतरांना माहिती न देता प्रथम दोरी कापून मृतदेह खाली ठेवला आणि त्यानंतर इतर व्यक्तींना घटनास्थळी बोलावले, हा घटनाक्रमही संशयास्पद असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच जानेवारी २०२६ मध्ये संशयित डॉ. नीलेश जेजूरकर आणि त्यांच्या कथित मैत्रिणीच्या मोबाईलमधील संदेश (मेसेज) तपासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत, या संदेशांच्या आधारे त्यांच्या परस्पर संबंधांबाबत तसेच प्रकरणातील घटनाक्रमाबाबत महत्त्वाचे तथ्य समोर येऊ शकते, असा युक्तिवाद अॅड. अभयसिंह भोसले यांनी केला. या सर्व परिस्थितींचा एकत्रित विचार करता, डॉ. मनीषा यांच्या मृत्यूची घटना केवळ आत्महत्या म्हणून पाहता येणार नसून, घटनास्थळावरील परिस्थिती, शवविच्छेदन अहवाल आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे यांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे, असा मुद्दा फिर्यादीच्या वतीने मांडण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT