Sunil Tatkare Pudhari
नाशिक

Maharashtra Politics 2026 | अजितदादांनी जे फेटाळले, ते सुनील तटकरेंनी स्वीकारले! नाशिकच्या तीन बड्या नेत्यांना पक्षाचा 'रामराम'?

Maharashtra Politics 2026 | प्रदेशस्तरावर अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे कारण समोर करत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तिघा नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे अजित पवार यांच्याकडे सादर केले होते.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रदेशस्तरावर अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे कारण समोर करत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तिघा नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे अजित पवार यांच्याकडे सादर केले होते. मात्र, अजित पवार यांनी राजीनामे फेटाळत तिघांनाही पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते.

मात्र, पवार यांच्या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तेच राजीनामे मंजूर केल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे २८ जानेवारीस विमान अपघातात निधन झाले. तत्पूर्वी २६ जानेवारीस पक्षाच्या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी आणि मोटार-मालक वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांनी अपमानास्पद वागणुकीच्या कारणास्तव अजित पवार यांच्याकडे राजीनामे दिले होते. मात्र, पवार यांनी या पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे नामंजूर केले. त्यांना पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते.

मात्र, पवार यांच्या निधनानंतर महिनाभरातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोणतेही कारण न देता तिन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर केले. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपणास माहिती नसल्याचे सांगितले.

पक्षात संवाद नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. तटकरे यांना याबाबत माहिती देण्यात आली की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सध्या नेतृत्वाच्या पातळीवर काही बदल झालेले आहेत. परंतु त्याची माहिती कार्यकत्यांच्या फळीपर्यंत पोहोचत नसल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे.

गेल्या २६ जानेवारीस आम्ही अजित पवार यांच्याकडे राजीनामे दिले. मात्र, त्यांनी राजीनामे फेटाळत आमची समजूत काढत कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानुसार आम्ही पक्ष वाढीसह पक्षाची ध्येयधोरणे जनमानसात पोहोचवण्यासाठी जोमाने कामाला लागलो. मात्र, अचानक प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी राजीनामे मंजूर केले. प्रदेशाध्यक्षांचा हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. आम्ही मांडलेली कैफियत यानिमित्त खरी ठरत आहे. लवकरच पुढील भूमिका जाहीर करू.
- सचिन जाधव, माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी वाहतूक सेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT