नाशिक : भुजबळांचे जेव्हा वाईट होते, तेव्हा मी खूश होतो. भुजबळांनी केलेल्या वाईट कृत्याचे जेव्हा त्यांना फळ मिळते, तेव्हा मला आनंद होतो, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना डिवचले आहे.
आ. कांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना कांदे यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले. तुम्ही खूश दिसत आहात अशी विचारणा पत्रकारांनी कांदे यांना केली असता ते म्हणाले, मी अजितदादांचे अभिनंदन करायला गेलो होतो. जेव्हा भुजबळांचे काही वाईट होते, तेव्हा मी नेहमीच खूश असतो. भुजबळांनी केलेल्या वाईट कृत्याचे जेव्हा त्यांना फळ मिळते, तेव्हा मला आनंद होतो. लोकसभा आणि विधानसभेत भुजबळांनी आमच्या विरोधात काम केले असून, त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे, असे नमूद करत भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने नाशिकमध्ये छान चालले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भुजबळांमध्ये पक्ष सोडण्याची हिंमत नाही. माझे भुजबळांना पुन्हा आव्हान आहे. भुजबळांनी वेगळे होऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी भुजबळांना दिले.