Sudhakar Badgujar on Dinkar Patil Pudhari News Network
नाशिक

Sudhakar Badgujar News | बडगुजर यांच्या प्रवेशामुळे शहरात गुंडगिरी वाढल्यास नवल वाटू नये

गुन्हेगारी रोखा अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा; जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप : मनसे सरचिटणीस दिनकर पाटील

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून, सर्रासपणे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त केला जावा, यासाठी मनसेने यापूर्वीच पोलिस प्रशासनास निवेदन दिले आहे. त्यामुळे आठ दिवसांत शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोहीम हाती न घेतल्यास जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

राजगड शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिनकर पाटील म्हणाले, शहर व जिल्ह्यात खून, दरोडे, चोरी, धमकावणे, चेनस्नॅचिंग, कोयता गँग, अवैध सावकारी, गाड्यांची तोडफोड, अमली पदार्थांची विक्री हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. यासंदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन, गुन्हेगारांविरोधात तत्काळ मोहीम हाती घेतली जावी, या मागणीचे निवेदन दिले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात सर्वसामान्यांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून, पोलिस यंत्रणांकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. नाशिक शांत शहर म्हणून ओळखले जाते. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची शांतता भंग झाली असून, शहराच्या प्रगतीला ही मोठी बाधा आहे. अशात पोलिस प्रशासनाने तत्काळ मोहीम हाती घेऊन नाशिक गुन्हेगारीमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सचिव संदेश जगताप, नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक संदीप दोंदे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळ आदी उपस्थित होते.

बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर पाटलांची टीका

मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी सुधाकर बडगुजर यांना भाजपने दिलेल्या प्रवेशावरून टीका केली. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी सातत्याने विरोध दर्शवून देखील, पक्षश्रेष्ठींना त्यांच्या विरोधाला डावलत बडगुजर यांना पक्षप्रवेश दिला. बडगुजर यांच्या प्रवेशामुळे शहरात गुंडगिरी वाढल्यास नवल वाटू नये, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT