नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासह शहरातील पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून शिवसेनेतून (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. मंगळवारी (दि.17) रोजी दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला. ज्यांचा आपणास विरोध आहे, त्यांची भूमिका प्रवेशानंतर बदलेल, असा दावा बडगुजर यांनी यावेळी केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देखील अंधारात होते.
नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा प्रवेश सोहळा मंगळवार (दि.17) रोजी झाला. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत 15 ते 20 जणांचा भाजपामध्ये हा प्रवेश पार पडला.
बडगुजर यांच्यासह माजी आमदार बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेवक अशोक सातभाई यांच्यासह ठाकरे गटातील माजी पदाधिकारी यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश झाला. समर्थकांनी भरलेल्या बसचा मोठा ताफा घेऊन बडगुजर हे नाशिकवरुन मंगळवारी (दि.17) रोजी सकाळीच मुंबईकडे रवाना झाले होते. दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडला. प्रवेशास स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध नसून केवळ नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्याकडून विरोध होता, असे बडगुजर यांनी सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलेला असून प्रवेशानंतर विरोध करणाऱ्यांची भूमिका बदलेल, असा दावा देखील बडगुजर यांनी यावेळी केला.
सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र अंधारात होते. याविषयी कुठलीही माहिती पक्षाकडून दिली गेली नसल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी बडगुजरांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्ष वाढीसाठी इतर पक्षांतून नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते येत असतील तर स्वागतच आहे. परंतु, ज्यांच्या प्रवेशाने पक्ष प्रतिमा मलीन होत असेल, त्यांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती.
भाजपच्या नाशिक विभागीय कार्यशाळेनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिकांचा विरोध असला तरी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत सकारात्मकता दाखविली होती. सत्ताधारी-विरोधक परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. गुन्हेही दाखल होतात. परंतु, न्यायालयात जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही, अशा प्रकारे कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्तीचे मूल्यमापन झाले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि ठाकरे गटाचे बडगुजर यांच्यात लढत झाली होती. काही समज-गैरसमज असतात. ते दूर होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. आम्हालाही पक्ष संघटन वाढवायचे आहेच.
पुढच्या काळात अनेक संकल्प हाती घेऊन ते विजयी करु. पक्ष प्रवेश होतो तो विकास आराखड्याचा होत असतो. नाशिक शहराचा विकास झाला पाहिजे म्हणून हा प्रवेश झाला असल्याचे घोलप, बडगुजर यांनी सांगितले आहे. त्यांना कुठलाही आशा, अपेक्षा नसून खरतरं हा प्रवेश सोहळ्यास उशीरच झाला असून हा प्रवेश झाला आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
मागील आठवड्यात आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध २९ गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात न्यायालयाने त्यांना दीड वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बदनामी, माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात त्यांची भूमिका राहिली, याकडे लक्ष वेधत पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशास कडाडून विरोध दर्शविला. त्यांना प्रवेश दिल्यास भाजपची प्रतिमा मलीन होईल. आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील, ही बाब संबंधितांनी मांडली होती.