Sudhakar Badgujar
नाशिक : ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका फोनवरुन हा निर्णय जाहीर करण्यात आला. ठाकरे गटाकडून आज बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद सुरू असताना नाशिकमधील पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोन आला. त्यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फोन केला. यानंतर सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (दि. २) भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना बडगुजर यांनी ही भेट घेतली होती.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बडगुजर अस्वस्थ आहेत. निवडणूक काळात त्यांच्या कुटुंबीयांवर झालेले राजकीय आघात, दाखल झालेले गंभीर गुन्हे यामुळे बडगुजर व्यथित आहेत. दरम्यानच्या काळात ते शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, 'मातोश्री'वरून बडगुजर यांची समजूत काढण्यात आली. जिल्हाप्रमुख पदावरून त्यांना उपनेते पदावर बढती देण्यात आली. त्यामुळे बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर पडदा पडला होता. दरम्यान, नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले.
आठवडाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकित जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले होते. सोमवारी (दि. २) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेने उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षसंघटनेतील फेरबदलांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या घडामोडींनंतर उबाठाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. ४) तातडीची पत्रकार परिषद बोलविली. त्यात त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
बडगुजर यांच्या शिवसेनेतून हकालपट्टीच्या मुद्यावर भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''अनेक लोक आणि पदाधिकारी असे म्हणतात, त्यांचा पक्ष सोडावा. संजय राऊत यांचे कर्तृत्व काय आहे हे सांगावे.? बोलण्यापलीकडे काय आहे...बडगुजर नाही तर अनेक कार्यकर्ते त्यांच्या पक्षात नाराज आहेत,'' असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून सुधाकर बडगुजर यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ते अधिकृत उमेदवार होते. सभागृह नेते, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य, २००७ पासून सलग नगरसेवक राहिले. सलीम कुत्ता प्रकरण, बडगुजर कंपनीत ठेका प्रकरणी एसीबी चौकशी, मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई, अशा अनेक कारणांमुळे बडगुजर चर्चेत राहिले.