Street Food Hub
स्ट्रीट फूड हब file photo
नाशिक

Nashik | नाशिकरोडला साकारणार 'स्ट्रीट फूड हब'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्वच्छ व सुरक्षित अन्न पध्दतीला चालना देण्यासाठी देशभरात १०० फूड स्ट्रीट उभारण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. याअंतर्गत राज्यात स्ट्रीट फूड हबच्या अंमलबजावणीसाठी नाशिकसह ठाणे, पुणे व नागपूर या चार महापालिकांची निवडक करण्यात आली आहे. फूड हबच्या उभारणीसाठी केंद्र शासनाकडून महापालिकेला एक कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेच्या घोषणेनंतर नाशिक महापालिकेने राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. नाशिकरोडला हे हब साकारले जाणार आहे.

नाशिक शहरात खवय्यैंकरीता ठिकठिकाणी चांगल्या दर्जाची हॉटेल्स उपलब्ध आहेत. याशिवाय चायनीज कॉर्नर, हातगाडे, दुकाने, चौपाटी, चौफुली आदी ठिकाणी जंकफूड, नाश्ता आणि चमचमीत जेवणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सर्वच ठिकाणी दर्जेदार, सकस, पौष्टीक व स्वच्छ अन्न मिळेल याची शाश्वती नाही. शिवाय याठिकाणी साफसफाई, स्वच्छता देखील फारशी नसते. खाद्यतेलाचा पुनर्वापर केला जातो. भांडी व इतर उपकरणे गंजरोधक धातुंपासून बनविलेली नसतात. बऱ्याचवेळा पिण्यासाठी स्वच्छ पाणी देखील उपलब्ध नसते. तरीही नागरिक या ठिकाणी अन्नपदार्थ खातात. त्यामुळे स्वच्छ व सुरक्षित अन्न पध्दतीला चालना देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात १०० फूड स्ट्रीट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात चार ठिकाणी स्ट्रीट फूड हबची निर्मिती केली जाणार आहे. त्यात नाशिकचा समावेश आहे. स्ट्रीट फूड हब विहित कालावधीत पूर्ण व्हावेत यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण यांनी निर्देश दिले असून याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याबाबत महापालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT