कळवण (नाशिक) : गायींच्या झुंजीत ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेल्यानंतर, मोकाट जनावरांच्या गंभीर समस्येवर भारतीय जनता पक्षाने आवाज उंचावला आहे. मंगळवारी (दि. २४) तहसीलदार रोहिदास वारुळे आणि कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवला यांना निवेदन देण्यात येऊन, शहरात तातडीने कोंडवाडा उभारून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
शहरात मोकाट जनावरे, विशेषतः गायी आणि म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वावरतात. सोमवारी (दि. २३) जुना ओतूर रोड, शिवाजीनगर येथे गायींच्या हल्ल्यात भालचंद्र रघुनाथ मालपुरे यांचा मृत्यू झाला असून, आबा मोरे हे जखमी झाले आहेत. यापूर्वीही गणेशनगरमध्ये अंधारात रस्त्यावरील जनावरे न दिसल्याने प्रवासी रिक्षाचा अपघात झाला होता. शहरातील चौक, मुख्य रस्ते आणि आठवडे बाजारातही मोकाट जनावरांमुळे अनेक वयोवृद्ध, महिला आणि वाहनधारकांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या समस्येकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
याबाबत भाजपचे दीपक खैरनार, सुधाकर पगार, डॉ. अनिल महाजन, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, नंदकुमार खैरनार, निंबा पगार, अशोक बोरसे, हेमंत रावले, संदीप अमृतकार आदींनी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, महसूलमंत्री यांनाही निवेदन पाठवून कार्यवाहीची मागणी केली आहे.
सोमवारच्या घटनेतील जनावरे पकडून त्यांना बेज येथील गोशाळेत पाठवले आहे. आजूबाजूच्या गोशाळांशी संपर्क साधून उर्वरित मोकाट जनावरे पकडून तिथे पाठवले जातील. त्या गायींच्या मालकांविरोधात पोलिसांच्या मदतीने गुन्हे नोंदवण्यात येतील. यापूर्वी दोन वेळा नगरपंचायतीने जनावरे पकडण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी काही नागरिकांनी अडथळे आणले होते. आता कुणी अडचण निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.नागेश येवले, मुख्याधिकारी, नगरपंचायत कळवण, नाशिक
मोकाट जनावरांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी कोंडवाड्याची उभारणी करावी. नागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले मालपुरे व जखमी मोरे यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी, जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर गुन्हे नोंदवावेत. पशुपालकांमध्ये जागृती करावी, अशी मागण्या भाजपतर्फे करण्यात आली आहे.