नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे येत्या ५ ऑगस्टला नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा घेतली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्हा परिषदांच्या गट-गट रचनेचे प्रारूपही प्रसिद्ध झाले आहे. महापालिकांच्या प्रारूप प्रभागरचनेला सुरूवात झाली आहे. मतदार याद्यांबाबतही निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.
यासंदर्भात यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी १० व ११ जुलै रोजी त्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक विषयक चर्चा केली होती. आता ५ ऑगस्टला ते नाशिक विभागातील निवडणुकांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेणार आहेत. सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायतींबाबत तर दुपारी ३.३० वाजता महापालिकांसंदर्भात बैठक होईल. या बैठकीसाठी निवडणूक आयुक्तांसोबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विशेष कार्य अधिकारी अ. गो. जाधव हे देखील उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी विभागीय आयुक्त, नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर व मालेगाव महापालिकांचे आायुक्तांना पाचारण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायती तसेच महापालिकांमधील सदस्य संख्या
मतदारयादी विभाजनाचे नियोजन
स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदान केंद्रांची संख्या
मतदान यंत्र, इतर निवडणूक साहित्याचा आढावा, पूर्वतयारी
मतदान केंद्रांच्या इमारतींमधील आवश्यक सुविधा
आवश्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची उपलब्धता
पाच महापालिका, पाच जिल्हा परिषदा, ५४ पंचायत समित्या, ४५ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती