नाशिक : जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिका निवडणुका दोन महिन्यांत होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. याबाबतचा आढावा निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हाधिकार्यांकडून गुरुवारी (दि.३०) घेतला. जिल्ह्यातील मतदान यंत्रे, मतदान प्रक्रियेसाठी मनुष्यबळ, दुबार नावे कमी करणे, मतदान केद्रांवरील सुविधांसह आवश्यक तयारीची माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांच्याकडून जाणून घेतली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७४ गट आणि पंचायत समितीच्या १४८ गणांसह नगरपालिका व नगरपरिषदेसाठी लवकच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणेसह राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. यासाठी आधी प्रभाग रचना त्यावर हरकती आणि सुनावणी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
आता प्रारूप मतदार याद्या, गट आणि गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व जिल्हाधिकार्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यात जिल्हानिहाय मतदार याद्यावर आलेल्या हरकती, दुबार नावे वगळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, मतदान केंद्र आणि त्या ठिकाणी आवश्यक असणारी मतदान यंत्रे, संबंधित यंत्रांची तपासणी पूर्ण झाली की नाही, मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, मतदान केंद्रावर मतदारांना देण्यात येणार्या आवश्यक सुविधांचा आढावा राज्य निवडणूक आयोगाने घेतला.
आज होणार सुनावणी
जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणुकीसाठी जाहीर आरक्षणावर ४७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या हरकतींवर शुक्रवारी (दि.३१) सुनावणी होऊन ३ नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
पहिल्या टप्यात नगरपालिका
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पालिका यांच्यापैकी आधी पालिकांच्या निवडणूक होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या आढाव्यात याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीने मोठी हानी झालेली आहे. या ठिकाणी शेतकर्यांसह अन्य बाधितांना शासकीय योजना आणि भरपाईचा लाभ मिळावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील निवडणूका दुसऱ्या टप्यात होण्याची शक्यता आहे.