विंचूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून पोबारा pudhari photo
नाशिक

विंचूरमध्ये खळबळ ! स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले, लाखोंची लूट

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते येवला रस्त्यावर स्विफ्ट गाडीतून आलेल्या दोन पेक्षा अधिक अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम तोडून लाखोंची रक्कम लुटून नेल्याने खळबळ उडाली आहे.

रात्री दीड वाजेच्या सुमारास शिरले चोर

या लुटी नंतर काही तासातच शिरपूर येथे अशी घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे याच टोळीने तेथेही हात मारला असावा असा अंदाज आहे. या गाडीतून दोन पेक्षा अधिक लोक आले असावेत. रात्री दीड वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम घेऊन ते फरार झाले. एटीएम मधील छेडछानी नंतर लासलगाव पोलीस कार्यालयास संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोरटे फरार झाले. या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज फिर्याद दाखल न झाल्याने समजलेला नाही तरी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे 33 लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती अशी माहिती हाती येत आहे

घटनास्थळी पोलिसांची धाव

या घटनेची माहिती समजतात लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, हवालदार सुजय बारगळ हवालदार घुमरे हवालदार निचळ, हवालदार निकम हवालदार डोंगरे, चालक देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि कारच्या दिशेने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला. निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी फिंगरप्रिंट तज्ञ पोलीस निरीक्षक जोशी हे देखील घटनास्थळी दाखल झाले या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक हे फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते.

पथके रवाना

याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली असून नशिकचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे देखील विंचूर येथे भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. अद्याप स्टेट बँकेच्या वतीने लासलगाव पोलीस कार्यालयात अधिकृत फिर्याद दाखल झालेली नाही ती दाखल झाल्यानंतर नेमकी लूट किती झाली असावी याबाबतचा अधिकृत तपशील हाती येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT