नाशिक : आदिवासी विकास विभागातर्फे मुंढेगाव येथील सेंट्रल किचनचा ठेका शनिवार (दि.१) पासून खासगी संस्थेला देण्यात आला आहे. यामध्ये सोळा हजार विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्यात येणार आहे.
सुमारे 16 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे जेवण बनविण्याची जबाबदारी बंगळुरू येथील शेफटॉक फूड अॅण्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची असणार आहे. ठेक्यादरम्यान प्रतिविद्यार्थी 109.70 रुपयांत सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचा अल्पोपाहार आणि रात्रीचे जेवण असणार आहे.
मुंढेगाव येथील सेंट्रल किचनच्या माध्यमातून नाशिक विभागातील सिन्नर, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आहार पुरविला जातो. यासाठी एकूण 24 पुरवठादार नेमण्यात आले आहेत, तर 28 वाहनांमार्फत 17 मार्गांवरील 45 शाळांना गेल्या नऊ वर्षांपासून जेवणाचा पुरवठा होत आहे.
सकाळचा नाश्ता : सकाळी 7 वाजता
दुपारचे जेवण : सकाळी 10 वाजता
संध्याकाळचा अल्पोपाहार : दुपारी 2.30 वाजता
रात्रीचे जेवण : सायंकाळी 6.30 वाजता
109.57 रुपयांत संपूर्ण खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. स्वयंपाकासाठी लागणारा सर्व कच्चा माल (अन्नधान्य, कडधान्य, किराणा, मासले व इतर माल) कुशल व अकुशल मनुष्यबळ, सामान साठवणूक, स्वच्छतेकरिता येणारा खर्च, प्रयोगशाळेची स्थापना व उपकरणे, इंधनखर्च, विद्युत देयक, पाणी देयक, जेवण पुरवण्याकरिता वाहनखर्च, उपकरणे व फर्निचरचा वार्षिक देखभाल दुरुस्तीचा खर्च, विमा खर्च याच्याशी आयुक्तालयाचा काहीही संबंध असणार नाही.