नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील ऐतिहासिक मंदिरांचे जतन, जीर्णोद्धार व संवर्धन करण्याच्या कामाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. रामकाल पथ प्रकल्पांतर्गत होणाऱ्या या कामासाठी नऊ कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सवानी हेरिटेज कन्झर्व्हेशन प्रा. लि. या कंपनीकडून हे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे गोदावरी परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहराला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत रामकाल पथ प्रकल्प राबवण्यात येत आहे. पंचवटी परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करून पर्यटनाला चालना देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
गोदाघाट आणि रामकुंड परिसर हा नाशिकच्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखिचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसरातील जुन्या मंदिरांचे आणि वाड्यांचे जतन, दुरुस्ती व जीर्णोद्धार झाल्यास ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच भाविक आणि पर्यटकांसाठी या परिसराचे महत्त्व अधिक वाढण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाच्या कामांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गोदाघाट, रामकुंड ते मालेगाव स्टँड परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आणि वाड्यांच्या संवर्धनाचा समावेश करण्यात आला. यामध्ये बालाजी कोट, गाडगे महाराज पूल परिसर तसेच इतर ऐतिहासिक वस्तूंच्या दुरुस्ती, जीर्णोद्धार आणि आवश्यक विद्युत कामांचाही समावेश आहे. या विस्तारित कामांसाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्याची किंमत नऊ कोटी २० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
या कामासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत एकूण पाच निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन निविदाधारक पात्र ठरले. त्यामध्ये सवानी हेरिटेज कन्झर्व्हेशन प्रा. लि. या कंपनीने सर्वात कमी दराची निविदा सादर केली होती.