नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला असून, साधू-महंत आणि भाविकांच्या निवासव्यवस्थेसाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्री दिंबर आखाडा आणि त्याच्याशी संलग्न आखाड्यांच्या परिसरात निवास सुविधा विकसित करण्यासाठी ३ कोटी २८ लाख ५७ हजार ७६८ रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देश - विदेशातून लाखो भाविक, साधू - संत आणि महंत नाशिकमध्ये येतात. श्री दिंबर आखाडा हा प्रमुख आखाडा असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे भाविक आणि साधू - महंतांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निवासव्यवस्थेचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुंभमेळा आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत आखाड्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि निवासव्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने या कामासाठी चार कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थापत्य आणि विद्युत कामांसाठी ३ कोटी ९९ लाख ९९ हजार ९२४ रुपयांचे प्राकलन तयार करून, ई - निविदा प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत मे. संजय वासुदेव गडाख यांची प्राकलन दरापेक्षा १८.५१३ टक्के कमी दराची निविदा सर्वात कमी ठरली. स्थायी समितीने या खर्चाला तसेच संबंधित कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास मंजुरी दिली आहे.