नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.13) रोजी जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल 93.04 टक्के इतका लागला असून, नाशिक विभाग राज्यात पाचव्यास्थानी आहे. विशेष म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेत 94.64 टक्के मुली तर 90.67 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला होता. यंदा 94.10 टक्के निकाल लागला असून, 1.71 टक्क्यांनी घसरला आहे. नाशिक विभागातून 1 लाख 98 हजार 707 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. त्यातील 1 लाख 97 हजार 14 विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी 1 लाख 83 हजार 305 उत्तीर्ण झाले. यातील 74 हजार 637 मुलांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले तर 68 हजार 638 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. 45 टक्क्यांच्या पुढे 33 हजार 886 तर 35 टक्क्यांच्या पुढे 6 हजार 144 विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. इयत्ता अकरावीचे वर्ग लवकर सुरू होत असल्याने तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेण्याच्या दृष्टीने यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दहा दिवस अगोदर मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, कन्नड, सिंधी व तेलगू या आठ भाषांमध्ये आयोजित करण्यात केली होती.
यंदा बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभागानेच प्रथम क्रमांक मिळविला. तर कोल्हापूर 96.87 गुण मिळवत दुसऱ्यास्थानी आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 90.78 टक्के इतका लागला आहे.
यंदा राज्यातील 9 विभागांतून 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांपैकी 8 लाख 30 हजार 309 मुले तर 7 लाख 27 हजार 711 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी 8 लाख 23 हजार 611 मुले तर 7 लाख 22 हजार 968 मुली परीक्षेस प्रविष्ट झाल्या. एकूण विद्यार्थ्यांपैकी 7 लाख 60 हजार 325 मुले तर 6 लाख 95 हजार 108 मुली पास झाल्या. 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्याचा निकाल 94.10 टक्के लागला आहे.