नाशिक : बिहार येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ मध्ये नाशिकची ॲथलेटिक्स सेंटरची खेळाडू भूमिका नेहाते ही सर्वांत वेगवान खेळाडू ठरली आहे. भूमिकाने २०० मीटरची धावण्याची शर्यत अवघ्या २४.५१ सेकंदात पूर्ण करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.
खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ मध्ये ॲथलेटिक्स सेंटरची खेळाडू १०० मीटर रिले प्रकारातही भुमिका नेहाते हीने सुवर्ण पदक पटकवत नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची मान भारतभर उंचावली आहे तर, श्रेयस जाधव याने ४०० मीटर रिले प्रकारात महाराष्ट्राच्या संघाला रौप्य पदक प्राप्त करून दिले आहे.
नाशिकच्या या दोन खेळाडूंनी महाराष्ट्राला दोन सूवर्ण आणि एक रौप्य पदक प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे दोन्ही खेळाडू मागील चार वर्षांपासून नियमित राष्ट्रीय एनआयएस कोच सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे नियमित सराव करत आहेत. नाशिकच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल विभागीय क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी या दोन्ही खेळाडूंचे काैतूक केले आहे. तसेच त्यांचे मार्गदर्शक सिद्धार्थ वाघ यांनी खेळाडूंच्या उत्तम कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नाशिक जिल्ह्याचे आणि राज्याचे देशाचे नाव आपल्या खेळामार्फत उंच व्हावे यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या या खेळाडूंना नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.