Samruddhi Highway Pudhari News Network
नाशिक

Samruddhi Highway | समृद्धीवरील अतिवेगच बेततोय जीवावर

उद्योजक सुनील हेकरे यांच्या अपघातानंंतर वाहनांच्या अतिवेगाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : प्रगत आणि वेगवानाचे प्रतिक म्हणून समृद्धी महामार्गाकडे बघितले जात असले तरी, महामार्गावरील अतिवेगच जीवावर बेतत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा चार दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. 'हायब्रॅण्ड' आणि अत्याधुनिक फिचर असलेल्या चारचाकीत मृत्यू झाल्याने, वाहनांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या फिचरवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असले तरी, वेगावर मर्यादा ठेवणे तितकेच महत्वाचे असल्याचे यानिमित्त अधोरेखित होत आहे.

गेल्या बुधवारी (दि.२५) उद्योजक सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान कारमद्ये प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापपूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली. त्यामुळे सुनील हेकरे गाडीतून बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर समृद्धीवरील वेग आणि नियमांचे पालन हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनील हेकरे यांच्या हायब्रॅण्ड कारचा वेग हा नियमापेक्षा अधिक होता. याशिवाय त्यांनी सीटबेल्टचा वापर केला होता काय? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, समृद्धी महामार्गावर चारचाकी वाहनांसाठी १२० किमी प्रति तास ही वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र, अलिशान कारच्या भरवशावर अनेकजण वेगमर्यादाच पाळत नसल्याचे यापूर्वी समोर आले आहे. सुनील हेकरे अपघात प्रकरणात देखील वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबाबत बोलले जात आहे. याशिवाय वाहन चालविताना सीटबेल्ट वापराबाबतही सक्त सूचना आहेत. मात्र, अनेक वाहनधारकांकडून या सूचनांचे पालनच केले जात नसल्याचे वारंवार समोर आले असून, हेकरे अपघात प्रकरणानंतर पुन्हा एकदा समृद्धीवरील वाहन नियमांची वाहनधारकांना उजळणी करून देण्याची गरज असल्याचे जाणकारांकडून बाेलले जात आहे.

समृद्धीवरील अपघाताची कारणे

  • अतिवेग

  • महामार्ग संमोहन

  • लेन कटिंग, वाहतुक शिस्तीचा अभाव

  • जुने टायरचा वापर

  • चालकांना डुलकी लागणे

  • रस्त्याच्या डिझाइनमधील समस्या

  • पायाभूत सुविधांची कमतरता

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अभाव

आतापर्यंत 17 हजार 255 अपघात

एका अहवालानुसार समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत १७ हजार २५५ अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात २१५ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ४०० अपघात झाले असून, टायर पंक्चर झाल्याने १३० आणि टायर फुटून १०८ अपघात झाले आहेत. तर अतिवेगामुळे दहा हजारांपेक्षा अधिक अपघात झाल्याची नोंद या अहवालात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT