नाशिक : राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा घेण्यासाठी देशाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.8) मुंबई येथे विशेष बैठक बोलावली आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा सादर करायचा आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी ४,८०० मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यातील ६८ मतदान केंद्रांवर १,५०० पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी असल्याने मतदानाच्या प्रक्रियेला होणारा विलंब टाळण्याच्या उद्देशाने त्या ६८ मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये ६८ नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन ती ४,८६८ होण्याची शक्यता आहे. या ६८ वाढीव मतदान केंद्रांबाबतही निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले जाणार असल्याचीदेखील माहिती समोर आली आहे.