Swine Flu | धोका स्वाईन फ्लूचा  
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिकमध्ये डेंग्यू अन् स्वाइन फ्लू रोखण्यासाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; आजपासून विशेष मोहीम

Nashik Municipal Corporation | मनपातर्फे 300 हून अधिक पथकांकडून घरोघरी सर्वेक्षण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांसह स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व मलेरिया विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दि. १० ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये विशेष घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार असून, ३०० हून अधिक विशेष पथके नागरिकांच्या घरी पोहोचून आरोग्य तपासणी व डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची कारवाई करणार आहेत.

पावसाळ्यानंतर साथीचे आजार तसेच कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जून महिन्यानंतर डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत अंशत: वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी मनपाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गती देण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकांमध्ये आशासेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, ए.एन.एम. यांच्यासह मनपाचे कीटक नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांमार्फत आरोग्यवर्धिनी केंद्र व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील घरे, रस्ते, वसाहती, कॉलनी तसेच परिसराचे आरोग्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणादरम्यान तापाचे रुग्ण आढळल्यास आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे.

डासांची उत्पत्तीस्थाने शोधणार

कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत घरांची तपासणी करण्यात येणार आहे. घरांमध्ये तसेच परिसरात साचलेले पाणी, विविध प्रकारचे पाणीसाठे आणि डासांची उत्पत्ती होण्याची संभाव्य ठिकाणे शोधून ती तातडीने रिकामी करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी पाणीसाठा रिकामी करणे शक्य नाही, तिथे आवश्यकतेनुसार अबेटिंगची कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी फॉगिंग, जंतुनाशक फवारणी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या कारवाईला वेग देण्यात येणार आहे.

दैनिक अहवाल सादर करण्याचे निर्देश

विशेष मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या सर्व कारवाईचा दैनिक अहवाल विहित नमुन्यात तयार करून दररोज सायंकाळी ५ पर्यंत मनपा मुख्यालयात सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.

डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे पाणीसाठे अथवा असच्छता आढळून आल्यास संबंधितांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT