helth file photo
नाशिक

नाशिक : अतिसार थांबविण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात अतिसार या आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी अतिसार थांबवा हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गावात पाणी व स्वच्छतेमध्ये शाश्वतता ठेवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४पर्यंत अतिसार थांबवा (स्टॉप डायरिया) हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आरोग्य व महिला बालकल्याण विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानांतर्गत सर्व संबंधित विभागांनी ग्रामपातळीवर सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवून पावसाळ्याच्या दिवसात जिल्हयात डायरिया आजाराचे प्रमाण वाढू नये, यासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश यावेळी सीईआे यांनी दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी आदि उपस्थित होते.

ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन शासनाने दिलेले उपक्रम राबविण्यासाठी आठवडानिहाय नियोजन करुन देण्यात आले आहे. एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. या अभियानात पाणी व स्वच्छता विभाग, महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांचा समावेश आहे.

अभियानात राबविण्याचे प्रमुख उपक्रम

• गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे

• घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे

• नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे

• पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे

• कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे

• पाणी पुरवठा गळती शोधुन त्याची दुरूस्ती करणे व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता उपक्रम राबविणे

• लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT