Drought Pudhari
नाशिक

Rahul Narwekar | एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही! धुळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ग्वाही

Rahul Narwekar |विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची ग्वाही : उत्तर महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शेतात उभे असलेले करपलेले पीक म्हणजे केवळ पिकाचे नुकसान नसते; त्यामागे शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट, कुटुंबाची स्वप्ने, मुलांच्या शिक्षणाच्या अपेक्षा आणि उद्याच्या जगण्याची चिंता दडलेली असते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तवदर्शी पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई व आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या प्रश्नांवर विधिमंडळातही संवेदनशीलतेने सखोल चर्चा घडवून आणण्याची आपली जबाबदारी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी (दि. २७) धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

दुष्काळ घोषित झाल्यानंतर नार्वेकर यांनी गोंदूर, निमडाळेसह धुळे तालुक्यातील विविध पंचक्रोशीतील गावांमध्ये थेट शेतात जाऊन कापूस, मका आणि अन्य पिकांची पाहणी केली. उन्हाने आणि पाण्याअभावी कोमेजलेल्या पिकांच्या रांगा, मातीतच अडकलेली शेतकऱ्याची गुंतवणूक आणि डोळ्यांसमोर कमी होत चाललेले अपेक्षित उत्पन्न पाहताना त्यांनी शेतकऱ्यांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला.

काही शेतकऱ्यांनी हातात आलेल्या पिकाची अवस्था दाखवली, काहींनी कर्जाची चिंता व्यक्त केली, तर काहींनी "आता पुढचा हंगाम कसा उभा करायचा?" असा थेट प्रश्न उपस्थित केला. नार्वेकर यांनी प्रत्येकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले. त्यांच्या वेदना केवळ निवेदनातील ओळी नसून त्या कुटुंबाच्या जगण्याशी निगडित आहेत, याची जाणीव ठेवून प्रशासनाने काम केले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

"दुष्काळ जाहीर होणे हा या प्रक्रियेचा शेवट नाही, तर मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची खरी सुरुवात आहे. पंचनाम्यात प्रत्येक बाधित क्षेत्राचे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे वास्तव प्रतिबिंबित झाले पाहिजे. एकही पात्र शेतकरी केवळ तांत्रिक बाबींमुळे मदतीपासून वंचित राहू नये," अशा स्पष्ट सूचना त्यांनी महसूल आणि कृषी यंत्रणेला दिल्या.

उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यात विविध भागांतील शेतात जाऊन कापूस, मका व इतर पिकांचे झालेले नुकसान आपण प्रत्यक्ष पाहिले असल्याचे सांगून नार्वेकर म्हणाले की, अनेक ठिकाणी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शेतकऱ्याने बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी केलेला खर्च आणि त्यानंतर पावसाअभावी हातातून निसटलेले पीक यामुळे त्याच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला आहे.

अशा वेळी प्रशासनाने कागदी प्रक्रिया म्हणून नव्हे, तर संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्याच्या भावनेतून पंचनामे करणे आवश्यक आहे. धुळे शहरालगतच्या काही भागांतील शेतकऱ्यांनी दुष्काळी लाभाच्या संदर्भातील अडचणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

शहर परिसरातील पाच किलोमीटरच्या आतील काही बाधित शेतकऱ्यांची नावे लाभाच्या यादीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल माहिती प्रशासनाकडून मागवून लागू निकषांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, उपसभापती संभाजी राजपूत, रायबा कुणाल पाटील, हर्शल साळुंखे, प्रभाकर भामरे, प्रांताधिकारी रोहन कुंवर, कृषी उपसंचालक प्रज्ञा पवार यांच्यासह शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT