सोयाबीन file photo
नाशिक

Soybean Purchase | शासकीय सोयाबीन खरेदीचा आज अखेरचा दिवस

3402 शेतकरी विक्रीपासून राहणार वंचित

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाफेड एनसीसीएफ या संस्थेमार्फत शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल भावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केली जात आहे. मात्र, या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी झालेल्या उत्पादकांपैकी 22 टक्केच शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आली असून 78 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकरी विक्रीपासून वंचित राहणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शुक्रवारी (दि. ३१) या शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे या खरेदी केंद्राला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, येवलासह इतर सोयाबीन खरेदी केंद्रावर चार हजार 275 शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली. बुधवारी (दि. २९) पर्यंत यातील 873 शेतकऱ्यांची 11 हजार 505 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे तर अजून 3402 शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे.

गतवर्षीपेक्षा आवक घटुनही भाव कमी

गेल्यावर्षी लासलगाव बाजार समितीत जानेवारी महिन्यात 32 हजार 367 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर कमाल तीन हजार 771, किमान तीन हजार रुपये तर सरासरी चार हजार 571 रुपये बाजार भाव मिळाला होता. यंदा जानेवारी महिन्यात 18 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर कमाल चार हजार 181, किमान दोन हजार 501 तर सरासरी चार हजार 080 रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनची 40 टक्के आवक कमी होऊनही बाजार भाव 600 रुपयांनी कमी असल्याची बाब या आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी बंद झाली तर सोयाबीन बाजार विक्रीसाठी दाखल होईल आणि आणखीन बाजार घसरले, अशी भीती उत्पादकांमध्ये दिसत आहे.

शासकीय हमी योजनेअंतर्गत 4 हजार 892 रुपयाने सोयाबीन खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी केली जात आहे. आज सोयाबीन खरेदीचा अखेरचा दिवस असून अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री करणे बाकी आहे. हीच सोयाबीन बाजार समितीत विक्री केल्यास तीन हजार ते ३७०० रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे केंद्राला मुदतवाढ द्यावी.
- मनोहर बोचरे, शेतकरी, देवगाव
सोयाबीन विक्रीसाठी एक महिन्यापूर्वी नोंदणी केली, मात्र बारदानाअभावी १५ दिवस सोयाबीन खरेदी बंद होती. आता कुठेतरी ही खरेदी पूर्ववत सुरू झाली आणि 31 जानेवारीला ही सोयाबीन खरेदी बंद होणार आहे. इतक्या दिवस सोयाबीन सांभाळून जर बाजारातच विक्री करण्याची शासकीय धोरणांमुळे वेळ येणार असेल तर नोंदणी करताच का... हा खरा प्रश्न आहे.
-महेश शिरसाठ, शेतकरी, देवगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT