नाशिक : महावितरणच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत सौर ऊर्जानिर्मितीला सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या नाशिक परिमंडळातील २२ हजार ८३९ ग्राहकांनी योजनेत सहभागासाठी अर्ज केेले आहेत. त्यापैकी ५ हजार १४८ ग्राहकांच्या घरांवर साैर यंत्रणा उभारण्यात आली असून, त्याची क्षमता १८.५ मेगावॉट आहे. (22 thousand 839 consumers in Nashik circle of Mahavitran have applied for Pradhan Mantri Suryaghar free electricity scheme)
केंद्रीय स्तरावरून दरमहा ३०० यंत्रणा मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रूफटॉप सोलर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. देशभरात योजनेंतर्गत ७५ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. त्याकरिता रूफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येणार असून, त्याचप्रमाणे १० किलोवॉटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे.
महावितरणचे महिनाभरात 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देतानाच अतिरिक्त वीजविक्रीतून उत्पन्न मिळविण्यासाठी सूर्यघर योजना राबविण्यात येत आहे.
नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक मंडळात एकूण १० हजार ५६० ग्राहकांनी अर्ज केला असून, त्यापैकी ३,५०३ ग्राहकांच्या घरी सौर यंत्रणा स्थापित झाली आहे.
मालेगाव मंडळात २ हजार ५७८ अर्जांपैकी २०५ ग्राहकांची सौर यंत्रणा बसविली.
अहमदनगर मंडळात ९ हजार ७०१ अर्ज प्राप्त झाले असून, १,४४० ग्राहकांकडे सौर यंत्रणा स्थापित करण्यात आली.
अशाप्रकारे नाशिक परिमंडळातील एकूण २२ हजार ८३९ ग्राहकांनी अर्ज केलेला असून, त्यातील ५ हजार १४८ ग्राहकांकडे १८.५ मेगावॉट क्षमतेची सौर यंत्रणा उभारण्यात आली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून रूफटॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॉटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते.