नाशिक : विद्युत आणि गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनी पाठोपाठ नाशिकमध्ये आता सौर उर्जेवर चालणारी पर्यावरणपूरक स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. पारंपरिक अंत्यसंस्काराच्या तुलनेत सौर उर्जेवर चालणाऱ्या या पर्यावरपूरक शवदाहिनीत केवळ २५ टक्के लाकूडफाट्यातूनच शवदहनाची प्रक्रिया केली जाणार आहे. याद्वारे तीन ते चार पटीने कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी शहरात विविध ठिकठिकाणी अमरधामची उभारणी करण्यात आली आहे. सर्व धर्मियांसाठी मोफत अंत्यसंस्कार योजना देखील राबवली जात आहे. नाशिक पूर्व विभागातील नाशिक अमरधाम येथे सद्य:स्थितीत १७ बेड असून त्यात १४ पारंपरिक बेड, २ इलेक्ट्रिक दाहिनी व एक गॅस दाहिनी आहे. सद्य:स्थितीत अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे जाळली जातात. साधारणपणे एका शव दहनासाठी सुमारे ४०० किलो लाकडाचा वापर होतो. त्यामुळे होणाऱ्या धुरामुळे हवेचे प्रदूषणही होते. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने सुरूवातीला विद्युत शवदाहिनी आणली.
परंतु, पारपंरिक पद्धतीनेच अंत्यसंस्कार व्हावेत, असा विचार अद्यापही कायम आहे. त्यामुळे लाकडांद्वारे होणाऱ्या पारंपरिक अंत्यसंस्काराला मागणी आहे. विद्युत शवदाहिनीचा वापरही सुरू आहे. आता प्रदूषणमुक्त अंत्यसंस्काराला चालना देण्यासाठी सौर उर्जेवर चालणारी शवदाहिनी महापालिकेने आणली आहे. नाशिक अमरधाममध्ये इलेक्ट्रीक दाहिनी समोरील मोकळ्या जागेत ही शवदाहिनी बसवली जात आहे. मुंबईतील इनक्युबेट कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत ही योजना राबवली जात आहे. सद्य:स्थितीत स्थापत्य विषयक कामे प्रगतीत असून चिमणी, फाउंडेशन व शेडचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतीत आहेत.
शव दहनासाठी १२५ किलो लाकडाचा वापर
विद्युत दाहिनीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पारंपरिक पद्धतीनेच परंतु, कमी लाकडाचा वापर करत सौर उर्जेद्वारे शव दाहिनीची प्रकल्प पुढे आला आहे. पारंपरिक शवदाहिनीत शव दहनासाठी सुमारे ४०० किलो लाकडाचा वापर होतो. सौर उर्जेवर चालणाऱ्या दाहिनीत केवळ १२५ किलो लाकडाचा वापर केला जाणार आहे. तीन ते चार पटीने कार्बन उत्सर्जन कमी करणारी व इतर हानीकारक गॅसेस कमी करू शकणारी ही सौर उर्जेवर चालणारी शवदाहिनी असणार आहे.