नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क - या वर्षातील शेवटचे सुर्यग्रहण हे उद्या बुधवार (दि. 2) रोजी रात्री होत आहे. रात्रीची वेळ असल्याने ते भारतातून दिसणार नाही. हा दिवस अश्विन महिन्यातील सर्वपित्री अमावस्याचा दिवस असल्याने खास राहणार आहे. कारण ज्योतिष शास्राबरोबरच खगोलीय अभ्यासकांसाठी देखील ग्रहण एक अभ्यासाची गोष्ट असेल. तर याच दिवशी श्राद्धपक्षाची देखील समाप्ती होत आहे.
बुधवारी 2 ऑक्टोबर 2024 रोजी या वर्षांचे शेवटचे सुर्यग्रहण होणार आहे. हे सुर्यग्रहन संपूर्ण सुर्यग्रहण नसून वलयाकार सुर्यग्रहण आहे. ज्यास ‘रिंग ऑफ फायर’ म्हटले जाते.
भारतीय वेळेनुसार, हे या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असून 2 ऑक्टोबर 2024 रोजी, रात्री 9.13 मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.17 मिनिटांनी ग्रहण कालावधी संपणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी अंदाजे हा 6 तास 3 मिनिटे राहणार आहे. हे ग्रहण रात्री होत असल्याने भारतातून दिसणार नाही, त्यामुळे भारतात ग्रहणाचा सुतक कालावधी वैध राहणार नाही असेही ज्योतिष शास्त्रानुसार सांगण्यात आलेले आहे.
भारता व्यतिरिक्त हे सुर्यग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग तसेच आर्क्टिक, अर्जेंटिना, ब्राझील, पेरु, फिजी, चिली, पेरु, होनालूलू, ब्यूनस आयर्स, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरका आणि प्रशांत महासागराच्या काही भागातून हे ग्रहण दिसणार आहे.