पथदिव्यांचा स्मार्ट एलईडी प्रकल्प Pudhari File Photo
नाशिक

'Smart Street' Lighting : ‘स्मार्ट स्ट्रीट’ लायटिंगविरोधात 1.40 लाख तक्रारी

पुढारी विशेष ! 'लक्स लेव्हल'बाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

शासनाच्या ऊर्जा धोरण २०१७ अंतर्गत नाशिक शहरातील पथदीपांसाठी महापालिकेने पीपीपी तत्त्वावर राबविलेल्या 'स्मार्ट स्ट्रीट लायटिंग' प्रकल्प अर्थात एलईडी दिव्यांबाबतीत मागील पाच वर्षांत तब्बल एक लाख ४० हजार तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. एखाद्या प्रकल्पाविषयी तक्रारी प्राप्त होण्याचा हा विक्रम आहे. दरम्यान, ॲपवर प्राप्त झालेल्या या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत केला जात असला, तरी या एलईडी दिव्यांच्या 'लक्स लेव्हल'बाबत अर्थात प्रकाश क्षमतेबाबत आता पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून २०२० मध्ये सार्वजनिक- खासगी भागीदारीतून (पीपीपी) शहरातील पथदीपांवरील सोडिअम दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्ट्स कंपनीमार्फत राबविण्यात आला. या प्रकल्पाची सुरुवातच वादातून झाली होती. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून कसाबसा हा प्रकल्प साकारला गेला. अखेर शहरातील १ लाख पाच हजार पथदीपांवर वीज बचत करणारे स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले. डिसेंबर २०२० पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. हा प्रकल्प महापालिकेची वीज बचत करणारा, प्रसंगी वीज बिलावर होणाऱ्या खर्चात कोट्यवधींची बचत करणारा असला, तरी एलईडी दिवे बंद असणे, पथदीप नादुरुस्त असणे, वीज बचत दाखविण्यासाठी संपूर्ण लाइन बंद ठेवली जाणे यांसारख्या तक्रारी या प्रकल्पाविषयी कायम आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांतच या प्रकल्पाविषयी तब्बल एक लाख ४० हजार ३९ तक्रारी महापालिकेच्या विद्युत विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांनी केला आहे.

काय आहे लक्स लेव्हल?

'लक्स लेव्हल' म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे, जे एका विशिष्ट पृष्ठभागावर किती प्रकाश पडतो हे दर्शवते. हे प्रकाशयोजनेत महत्त्वाचे आहे. 1 लक्स म्हणजे 1 चौरस मीटर पृष्ठभागावर 1 लुमेन प्रकाश प्रवाह. हे पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेचे मोजमाप आहे.

मागील पाच वर्षांपासून हा प्रकल्प सुरळीत सुरू आहे. या प्रकल्पात महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही. रस्त्यावर राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रकाशाची तीव्रता निश्चित करण्यात आली आहे. तक्रारींचे निराकरण ७२ तासांच्या आत केले जाते.
अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता, विद्युत, नाशिक महानगरपालिका

पथदीपांविषयी येथे करा तक्रार

पथदीपांविषयी तक्रार करण्यासाठी महापालिकेने टोल फ्री क्रमांक १८००२६७७९५३ उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ॲपवरही २४ तास तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे. ७२ तासांच्या आत तक्रारीचे निराकरण केले जाते, अशी माहिती कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांनी दिली आहे.

स्मार्ट लायटिंग प्रकल्पाविषयी तक्रारींचा आढावा

वर्ष - तक्रारींची संख्या

  • २०२० - ४६९

  • २०२१ - १७२

  • २०२२ - २३,८१५

  • २०२३ - ३६,१३८

  • २०२४ - ४७,२०१

  • २०२५ - जुलैपर्यंत ३२,२४४

  • एकूण - १,४०,०३९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT