Bhal To Nandivali Road Dangerous Potholes Pudhari
नाशिक

Nashik Potholes | कणा मोडला, चाके रुतली, प्राण कंठाशी! स्मार्ट सिटी नाशिक खड्ड्यांच्या गर्तेत, महापालिका यंत्रणेची तारांबळ

Nashik Potholes | स्मार्ट सिटीच्या वाटेवरील कुंभनगरी नाशिक खड्ड्यांच्या गर्तेत : विकासकामे करताना महापालिका यंत्रणेची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटी आणि आगामी कुंभमेळाच्या विविध विकासकामांमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते खोदून ठेवल्यामुळे शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः शहरातील महत्त्वाच्या नांदूर नाका चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रकार वाढले आहेत, तर याच ठिकाणी संधीचा फायदा घेत, नियमांच्या नावाने वाहनचालकांची लूटफेरीही सुरू आहे.

नांदूर नाका हा पंचवटी, नाशिकरोड, मुंबई - आग्रा महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गाचा प्रमुख चौक आहे. येथे गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू असले, तरी कामाच्या संथ गतीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी वाहनचालकांना खूप कष्टाने प्रवास करावा लागत असून, हा मार्ग दुचाकीस्वारांस धोकादायक ठरत आहे.

खड्ड्यांमुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी

खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी तसेच मणक्याच्या विकारांचा त्रास वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रोजचा प्रवास त्रासदायक आणि धोकादायक झाल्याने स्थानिक रहिवाशांकडून दुरुस्तीची मागणी तीव्र झाली आहे.

सोलिंगचे दगड अपघातांना कारणीभूत

खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मोठ्या आकारातील सोलिंग दगडांमुळे दुचाकी घसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. या दगडामुळे वाहनांचे नुकसान होत असून, दररोज लहान - मोठे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्याच्या निकृष्ट दुरुस्तीबाबत संबंधित कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

नागरिकांची आर्त हाक

"गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी आम्हाला खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे प्राण गेल्यानंतर या चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू झाले परंतु अजून किती नागरिकांचे प्राण गेल्यानंतर हा उड्डाणपूल सुरू होणार? या ठिकाणी खड्डे बुजविण्याऐवजी दगड टाकून कंत्राटदाराने दुचाकीचे अपघात होत आहेत." "नांदूर नाका परिसरासह शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे थांबवावे आणि विकासकामे वेळेत पूर्ण करून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिकांनी महापालिका, प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडे केली आहे." "शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे."
— अमजद पठाण, स्थानिक नागरिक

'होली फ्लॉवर' शाळेजवळ उघड्या डीपीने गायीचा मृत्यू

नाशिकरोड : शहरातील उघड्या विद्युत वितरण पेचा (डीपी) नागरिक, प्राण्यांच्या जिवावर बेतत असल्याचे आणखी एक गंभीर उदाहरण सोमवारी सकाळी श्रीरामनगर परिसरात समोर आले. होली फ्लॉवर शाळेजवळ असलेल्या उघड्या विद्युत डीपीचा वीजप्रवाहाचा धक्का बसून गायीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही डीपी शाळा आणि गजबजलेल्या भाजी मार्केटच्या अगदी शेजारी असून, दररोज विद्यार्थी, पालक, विक्रेते, नागरिक याच मार्गाने ये - जा करतात. गाय डीपीजवळ गेली असता झाकण उघड्या डीपीमध्ये तिचे शिंग अडकले आणि तीव्र विद्युत धक्क्याने तिचा मृत्यू झाला.

"शाळेजवळ उघडी विद्युत डीपी असणे धोकादायक आहे. आज गायीचा मृत्यू झाला, उद्या एखाद्या विद्यार्थ्याबाबत अशी दुर्घटना घडू शकते. महावितरणने या डीपीला सुरक्षित कव्हर बसवून परिसरातील उघड्या डीपींची पाहणी करावी."
— सुदीप देव, सेक्रेटरी, होली फ्लॉवर स्कूल

सातपूरला राधाकृष्णनगरात खड्ड्यांचे साम्राज्य

वाढत्या अपघातांमुळे चाकरमाने, विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

विभागातील प्रभाग १० मधील राधाकृष्णनगर, मात माऊली ते रेणुका माता मंदिर मार्ग, जाईचा मारुती मंदिर परिसर, संभाजीनगर तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः हॉस्पिटल परिसरातील मोठेमोठे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, पावसाळा सुरू असताना रस्त्याची दुरुस्ती कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

"गेल्या महिन्याभरापासून हॉस्पिटलजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव गृहीत धरून वाहन चालवावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातासह आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत."
— डॉ. चंद्रकांत शोंडे, राधाकृष्णनगर

सिडको प्रभाग २५ मध्ये खड्डे बुजविण्यास प्रारंभ

सिडको : पुढारी वृत्तसेवा

विभागात प्रभाग २५ मधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम मनपार्फे युद्धपातळीवरून सुरू झाले आहे. उर्वरित खराब रस्त्यांचीही दुरुस्ती लवकरात लवकर करून प्रभागातील सर्व रस्ते सुस्थितीत आणावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

प्रभाग २५ मधील त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पाटीलनगर, पवननगर आदी परिसरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे धोकादायक झाले होते, तर पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे कठीण झाले होते. या गंभीर समस्येबाबत ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर भामरे व माजी नगरसेविका साधना मटाले यांनी महासभेत सातत्याने आवाज उठवित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, प्रभाग २५ मधील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक मुरलीधर भामरे, नगरसेविका साधना मटाले, सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक, पवन मटाले उपस्थित होते. सध्या त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पाटीलनगर, पवननगर तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT