निल कुलकर्णी, नाशिक
स्मार्टफोनसह सहज आणि स्वस्तात उपलब्ध झालेला इंटरनेट डेटा, टीव्ही, सोशल मीडियावरील हिंसात्मक कार्यक्रम, हिंसक मोबाइल गेमिंग आणि कमी झालेली सहिष्णु वृत्ती यामुळे कुमारवयीन मुलांमध्ये हिंसक वर्तनात प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण समाज अभ्यासकांनी नोंदवले आहे. मूल्याधारित शिक्षण आणि 'आध्यात्मिक बुद्ध्यांक' यांच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येईल, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.
कुमार आणि किशोरवयीन मुलांमध्ये सध्या वाढलेल्या हिंसेकडे लक्ष वेधले जात असून, ते अधिक असंवेदनशील, चिडचिडे आणि असहिष्णु झाले असल्याचे मुलांवर काम करणाऱ्या संस्था तसेच समाज अभ्यासकांनी नमूद केले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने २०२३मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालातही मुलांमधील हिंसक प्रवृत्ती वाढल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
एकट्या नाशिकमध्ये गेल्या अडीच वर्षांत ४७३ किशोरवयीन मुले खून, खुनाचा प्रयत्न, चोरी अशा हिंसक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवरून समोर आले आहे. अपमान, मोबाइल किंवा पैसे न मिळणे अशा किरकोळ कारणांमुळेही कुमारवयीन मुलांनी जीवनयात्रा संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रमाण वाढले आहे.
मोबाइल, सोशल मीडिया, अमली पदार्थ, दारू यांचे व्यसन, आनुवंशिकता, पालकांचे वर्तन, पालक-पाल्यांमधील संवादाचा अभाव, तसेच टीव्ही आणि यूट्यूबवरील हिंसक कार्यक्रम यामुळे मुले हिंसक होत आहेत. पालकांनी पाल्यांशी सुसंवाद साधून त्यांना मूल्यशिक्षण द्यावे.डॉ. महेश भिरुड, मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक.
मोबाइल गेमिंग, सीआयडी, क्राइम पेट्रोल यांसारखे गुन्हेप्रधान कार्यक्रम पाहिल्यामुळे मुलांमध्ये हिंसकता वाढत असून, सहिष्णुता घटली आहे. मुलांची ऊर्जा छंद, कला आणि भरपूर मैदानी खेळांकडे वळवावी. मोबाइल आणि टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा.अर्पणा चव्हाण, समाजअभ्यासक व समुपदेशक, पुणे
हिंसक वृत्तीवर उपाय
मुलांना छंद, वाचन आणि मैदानी खेळांकडे प्रवृत्त करावे.
पालकांनी मुलांना वेळ देत सुसंवाद ठेवावा.
आध्यात्मिक बुद्ध्यांक व भावनांक वाढवावा.
मुलांसह पालकांनीही मुलांच्या संगोपनासाठी समुपदेशन घ्यावे.