Nashik TCS Case | नगरसेवक मतीन पटेल यांची एसआयटीकडून चौकशी  Pudhari
नाशिक

Nashik TCS Case | नगरसेवक मतीन पटेल यांची एसआयटीकडून चौकशी

तांत्रिक विश्लेषणासाठी मोबाईल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचार्‍यांच्या कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन पटेल व घर मालक हानिफ खान यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी दिवसभर कसून चौकशी केली. तपासाच्या अनुषंगाने त्यांचा मोबाईल फोनही एसआयटीने ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

देशभरात खळबळ उडवून देणार्‍या या प्रकरणात आधीच पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य संशयित निदा खान ही घटनेनंतर फरार होती. तिचा मुंब्रा, सोलापूर मार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास झाल्याचे तपासात उघड झाले आहे. अखेर एसआयटीच्या पथकाने तिला छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातून अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर तिला आश्रय मिळवून देण्यात कोणाची भूमिका होती, याचा तपास वेगाने सुरू आहे.

निदा खानने मतीन पटेल यांच्याशी संपर्क कसा साधला, त्यासाठी मोबाईल, सोशल मीडिया किंवा अन्य कोणते माध्यम वापरण्यात आले, यामध्ये कोणाची मध्यस्थी होती का, तसेच आश्रय देण्यामागे नेमका उद्देश काय होता, या मुद्द्यांवर तपास पथकाने सखोल प्रश्नांची सरबत्ती केली. तपासादरम्यान मतीन पटेल यांचा निदा खानच्या मावशीशी मोबाईलवर संपर्क झाल्याचेही निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT