SIR voter list pudhari photo
नाशिक

SIR Voter List Nashik | मतदार यादीत नाव नाही? 30 नोव्हेंबरपर्यंत 'एसआयआर'मध्ये नाव समाविष्ट करण्याची सुवर्णसंधी

SIR Voter List Nashik | ३० नोव्हेंबरपर्यंत स्वगणना प्रपत्र भरून देण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

विशेष सखोल पुनिरीक्षणांतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना आता मतदार म्हणून नोंदणीची संधी उपलब्ध झाली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.

कोणत्याही मतदाराचे नाव केवळ अंदाजाच्या आधारे यादीतून वगळण्यात येणार नसून, त्यासाठी ठोस पुरावे आणि पडताळणी अहवाल आवश्यक राहणार आहे. घरोघरी भेटीदरम्यान गणना प्रपत्र सादर न केलेल्या तसेच ज्यांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, अशा मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली होती.

मात्र, अशा प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष खातरजमा करण्याचे निर्देश आयोगाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिले आहेत. त्यानंतर बीएलओ संबंधित मतदारांच्या घरी पुन्हा भेट देऊन ते अनुपस्थित आहेत, कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत, त्यांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांची दुबार नोंदणी झाली आहे का, याची तपासणी करत आहेत. या पडताळणीसाठी शेजारी, नातेवाईक, रहिवासी संघटना, ग्रामपंचायत तसेच स्थानिक नोंदींच्या आधारे माहिती संकलित केली जाणार आहे.

प्रत्येक प्रकरणाची सविस्तर नोंद पडताळणी अहवालात करून तो स्वाक्षरीसह मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नोंद न झालेल्या मतदारांची स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे. दुबार नोंदणीचा संशय असल्यास संबंधित दोन्ही ठिकाणांच्या नोंदी तपासल्या जातील.

मृत मतदारांच्या प्रकरणात मृत्यू दाखला किंवा कुटुंबीयांचा जबाब घेतला जाणार असून स्थलांतरित मतदाराने नवीन पत्त्यावर नोंदणी केली आहे किंवा नाही, याचीही खातरजमा केली जाणार आहे. बीएलओंनी सादर केलेल्या अहवालाची छाननी केल्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६ मध्ये अर्ज करावा. यापूर्वी हा अर्ज केला असल्यास पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

नाव नोंदणीसाठी काय करावे?

  • प्रारूप यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक ६ भरून अर्ज करावा.

  • नाव नोंदणीसाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

  • अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबारनोंदीच्या यादीत नाव असल्यास प्रत्यक्ष पडताळणी करून घ्यावी.

  • गणना प्रपत्र भरूनही नोंद झालेली नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT